दारू पिऊन मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ करण्याच्या वादातून मोठा अनर्थ घडला आहे. नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खापरी पुनर्वसन भागात ही घटना घडली आहे.
या भागात सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाच्या गळ्यावर चाकूचा वार करून त्याला ठार केले आहे. माझ्या बायकोला शिवीगाळ केल्याचा राग धरून मोठ्या भावाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे.
वैभव जुमडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर हरी जुमडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत वैभव याला दारू पिण्याची सवय होती. दारू पिऊन तो नेहमी घरात शिवीगाळ करायचा.
याच कारणामुळे या दोन्ही भावांत वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे वैभव दारू पिऊन घरी आला. त्याने हरीशच्या मुलांना आणि पत्नीला शिवीगाळ करत केली. मोठ्या भावाने (हरीश)विचारणा केली असता त्याने आपल्या मोठ्या भावालाही शिवीगाळ करायला सुरुवात केली.
या शिवीगाळीमुळे रागात येऊन आरोपी हरीशने वैभवच्या गळ्यावर चाकूचा वार केला. यातच वैभवचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन खून केल्याची कबुली दिली आहे. आता पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.