पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. खराडी येथे एका घरात चालू असलेल्या या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई रंगेहाथ पकडले गेले आहेत. या पार्टीत गांजासदृश पदार्थ तसेच दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. दरम्यान, आता हे प्रकरण समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
मंगेश चव्हाण यांची बोचरी टीका
सध्या खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी खडसे यांचे जावई रेव्ह पार्टीत सापडल्याने भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी समोर येत कठोर टीका केल आहे.
प्रांजल खेवलकर यांनीच पार्टी आयोजित केली
या प्रकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नाही. कारण त्या रेव्ह पार्टीत खडसे यांचे जावई होतो ही वस्तूस्थिती आहे. खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनीच ती पार्टी आयोजित केली होती. कारण त्यांच्याच नावाने तो फ्लॅट बुक करण्यात आला होता. या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी
तसेच पुढे बोलताना, ड्रग्जच्या तस्करीत खडसे यांच्या जावयाचाही संबंध असलाच पाहिजे, असा खळबळजनक दावा मंगेश चव्हाण यांनी केला आहे. खडसे यांच्यासारख्या परिवारातील एखादी व्यक्ती रेव्ह पार्टीत सापडली असेल तर या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खडसे यांचे अनेक महिलांशी लैंगिक संबंध
दरम्यान, याच मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी लैंगिक संबंध होते. त्या महिला खडसे यांच्याकडे रात्र-रात्र येऊन राहायच्या. सकाळी लोक या महिलांना सोडायला जायचे. हे सगळं काही बघणारा व्यक्तीच सांगत होता असा दावा मंगेश चव्हाण यांनी केला होता. दरम्यान, खडसे यांचे जावई सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत. या चौकशीतून काय समोर येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.