मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी(Ganesh Mandals) यंदाच्या वर्षी एक नवे आव्हान उभं राहिले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारणीसाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डा खोदल्यास प्रत्येक खड्ड्यावर 15 हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी 2 हजार रुपये असलेली ही रक्कम तब्बल साडेसात पटीनं वाढवण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे अनेक मंडळांनी नाराजी व्यक्त केली असून, हा दंड मागे घेण्याची मागणी तीव्र होत आहे
सार्वजनिक मंडळांवर वाढलेले आर्थिक ओझे :
मुंबईतील हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं (Ganesh Mandals)मंडप उभारण्यासाठी स्थानिक रस्ते, पदपथांचा वापर करतात. यासाठी काहीवेळा खांब उभारणीसाठी खड्डे खोदावे लागतात. मात्र, प्रत्येक खड्ड्यासाठी 15,000 रुपये दंड ही रक्कम मंडळांच्या आर्थिक क्षमतेपलीकडे आहे, असं मंडळांचं म्हणणं आहे. अनेक मंडळांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत महापालिकेकडे पुनर्विचाराची मागणी केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव ही अनेक वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे आणि सरकारनेही यावर्षी या सणाला “महाराष्ट्राचा राज्य उत्सव” म्हणून मान्यता दिली आहे. अशा पार्श्वभूमीवर मंडळांवर दंडात्मक कारवाई करणं योग्य नसल्याचा सूर मंडळांनी लावला आहे.
महापालिकेचं स्पष्ट मत: पर्यावरणपूरक आणि खड्डाविरहित उत्सव आवश्यक :
महापालिकेने स्पष्ट केलं आहे की, मंडप उभारणी करताना रस्त्यांना इजा होणार नाही याची खबरदारी घेणं बंधनकारक आहे. मंडळांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डाविरहित मंडप रचना करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. जर खड्डे आढळले, तर संबंधित मंडळांकडून रस्त्याच्या दुरुस्तीचा खर्च आणि दंड वसूल केला जाईल, असा इशारा BMC ने दिला आहे.
याचबरोबर, मंडळांसाठी ऑनलाइन ‘एक खिडकी प्रणाली’ देखील कार्यान्वित करण्यात आली असून, परवानग्यांसाठी https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.