Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगतिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल. नवीन काय असणार?

तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल. नवीन काय असणार?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) इयत्ता तिसरी ते दहावीसाठी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार केला आहे.

त्यानुसार आता अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे.

 

इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षण लागू केले जाणार आहे, तर इयत्ता नववीसाठी समाजातील व्यक्ती, दहावीसाठी पर्यावरण शिक्षण पाठ्यक्रम प्रथमच स्वतंत्रपणे तयार करण्यात आला असून, या आराखड्याच्या मसुद्यावर २७ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत.

 

‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य मंडळाशी संलग्न शाळांमध्ये आता नवा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. यंदा शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये इयत्ता पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम लागू करण्यात आला. त्यानंतर २०२८पर्यंत उर्वरित इयत्तांसाठी नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता तिसरी ते दहावी या इयत्तांसाठीच्या अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार करून पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ अशा विविध भागधारकांसाठी https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर खुला केला आहे.

 

नव्या अभ्यासक्रमात विषयांचे समाकलन, सर्जनशीलता, प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. तसेच भारतीय ज्ञानप्रणाली, मूल्ये आणि स्वभाववृत्ती, पर्यावरणविषयक अध्ययन आणि काळजी, शाळांमधील समावेशन, शाळांमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन, शाळेतील शैक्षणिक तंत्रज्ञान या आंतरसमवाय क्षेत्रांचा विविध विषयांमध्ये एकात्मिक स्वरूपात समावेश करण्यात आला आहे.

 

असा आहे मसुदा…

 

इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी असणाऱ्या ‘परिसर अभ्यास’ (भाग-एक आणि दोन) विषयाऐवजी ‘आपल्या सभोवतालचे जग (भाग एक आणि दोन) हा विषय.

भाग एकमध्ये विज्ञान आणि भूगोल विषयातील आशयाचा समावेश, तर भाग दोनमध्ये इतिहास व नागरिकशास्त्र विषयातील आशय. इयत्ता चौथीसाठी ‘शिवछत्रपती’ हे पाठ्यपुस्तक कायम.

इयत्ता सहावीपासून इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयांसाठी, तर इयत्ता नववीपासून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी स्वतंत्र पाठ्यक्रम.

इयत्ता अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) अंतिम केल्यानंतर त्या अभ्यासक्रमाच्या आधारे अभ्यासक्रम.

इयत्ता सहावीपासूनच्या व्यावसायिक शिक्षणामध्ये प्रत्यक्ष अनुभवासह कृषी, कुक्कुटपालन, बागकाम, मेकेट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्नप्रक्रिया, लाकूडकाम, पर्यटन अशा रोजगार कौशल्याचा अभ्यासक्रम.

तिसऱ्या भाषेबाबत निर्णय नंतर

 

इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरण अंमलबजावणीबाबत समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी, त्यावरील होणाऱ्या शासनाच्या निर्णयास अनुसरून तिसऱ्या भाषेबाबत निर्णय लागू करण्यात येईल. तोपर्यंत सध्याची पद्धती सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -