आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा युएईत होणार असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला भारत पाकिस्तान संघ वेळापत्रकानुसार 14 सप्टेंबरला भिडणार आहेत. पण या सामन्यापूर्वीच राजकीय आणि देशात खळबळ उडाली आहे. कारण ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग 2025 स्पर्धेतही भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही. त्यामुळे भारत पाकिस्तान संघ क्रिकेट मैदानात एकत्र येणार नाहीत अशीच स्थिती आहे. भारतीय क्रीडारसिकांचं म्हणणंही तसंच आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी त्यांची भावना आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हा सामना रद्द होणं कठीण आहे. एनडीटीव्हीनुसार, एका सूत्राने सांगितले की एसीसी म्हणजेच आशियाई क्रिकेट परिषदेचे म्हणणे आहे की ही दोन संघांमधील मालिका नाही तर बहु-राष्ट्रीय स्पर्धा आहे. भारताने हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानला फुकटचे गुण मिळतील आणि ते पुढच्या फेरीत जातील. पण असा निर्णय योग्य ठरणार नाही.
दरम्यान, ही स्पर्धा आयसीसी नाही तर आशियाई क्रिकेट परिषद आयोजित करते. त्यामुळे भारत पाकिस्तान हा सामना रद्द होणं कठीण आहे. सध्या एसीसीचे अध्यक्ष पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आहेत. या स्पर्धेचे अधिकार सोनी नेटवर्कला मिळाले आहेत. आठ वर्षांसाठी 17 कोटी अमेरिकन डॉलरचा हा करार आहे. जवळपास 1475 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना झाला तर सोनी नेटवर्कला फायदा होईल. पण हा सामना रद्द झाला तर ब्रॉडकास्टर आणि उत्पन्नावर थेट परिणाम होईल. इतकंच काय तर 24 एसीसी सदस्यांचंही नुकसान होईल.
जाणून घ्या आशिया कप स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत
आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. गट अ मध्ये भारतासोबत पाकिस्तान, ओमान आणि युएई हे संघ आहेत. भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध 14 सप्टेंबरला दुसरा सामना असेल. साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमानविरुद्ध 19 सप्टेंबरला होईल. यानंतर सुपर सिक्स फेरीचे सामने होतील. या फेरीतही भारत पाकिस्तान आमनेसामने येतील. उपांत्य फेरीचं गणित सुटलं की थेट अंतिम फेरीत देखील भिडू शकतात.