मागील भांडणाच्या कारणावरुन १५ ते २० जणांनी ८ जणांना घातक शस्त्राने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना २४ जुलै रोजी दुपारी २.३० च्या सुमारास शिशू संगोपन शाळा चितळेरोड, गोगादेव मंदिरशेजारी नालेगाव येथे घडली होती.
या प्रकरणी सोमवारी (ता. २८) तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोहन जयेंद्र चव्हाण (वय २७, रा. म्युनिसिपल कॉलनी, दिल्लीगेट) याने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पवन दीपक पवार, शिवम दीपक पवार, आदित्य लहू सकट, आदर्श रमेश साळुंखे, हर्षल लक्ष्मण सारसर, अमोल ऊर्फ भय्या गोरे, किरण बापू जरे, चेतन रवींद्र निंदाणे, राहुल अंबादास रोहकले, आयान शेख, यश प्रदीप पवार (सर्व रा. म्युन्सिपल कॉलनी, दिल्लीगेट, नालेगाव), प्रशांत प्रदीप दळवी (वारुळाचा मारुती, नालेगाव), गणेश संतोष भुजबळ (दातरंगे मळा, नालेगाव) यांच्यासह अनोळखी पाच ते सहा यांनी मागील भांडणाच्या कारणावरुन न्यायालयात झालेल्या शिक्षेच्या कारणावरुन लोखंडी रॉड, लाकडी दांडके व धारदार शस्रे घेऊन फिर्यादी यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करुन शिवीगाळ दमदाटी करीत बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केला.
या मारहाणीत फिर्यादी, फिर्यादीची आत्या, फिर्यादीचे चुलते जितेंद्र चव्हाण, प्रियंका कांबळे, फिर्यादीची पत्नी नीलम चव्हाण, अनिता चव्हाण, देवयानी हंस, संगीता दीपक पवार हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रोहन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गोंटला हे करीत आहेत.