एसटीतून कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या कोल्हापूरमधील एकास मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत घडली. दरोडेखोरांनी रोख 35 हजार रुपये, सोन्याच्या दागिन्यांसह अंदाजे 95 लाखांचा ऐवज असलेली बॅग लंपास केली.
लूटमार सुरू असतानाच एसटीतील प्रवाशांनी एका संशयितास पकडून त्यास पोलिसांच्या हवाली केले आहे; तर अन्य संशयितांनी कारमधून पोबारा केला. पोलिसांची तीन पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
राहुल दिनकर शिंगाडे (28, रा. शिंगणापूर,ता. माण) असे पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत कुंडलिक शिंदे (रा. कोराळे, ता. फलटण, सध्या रा. रंकाळा स्टँड, कोल्हापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी, प्रशांत शिंदे हे मंगळवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर – मुंबई एसटीने मुंबईला जात होते. एसटी रात्री एकच्या सुमारास तासवडे टोल नाक्यापासून काही अंतरावरील वराडे गावच्या हद्दीतील हॉटेल श्रावणी येथे जेवणासाठी थांबली होती. त्यावेळी शिंदे आपली बॅग घेऊन बाथरूमसाठी गेले. त्याचवेळी तीन ते चार संशयितांनी अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला आणि मारहाण करत त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे यांनी आरडाओरडा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी इतर प्रवाशांनी धाव घेत संशयितांवर हल्ला केला. या झटापटीत संशयितांनी शिंदे यांच्याकडील बॅग हिसकावत कारमधून सातार्याच्या दिशेने भरधाव पलायन केले; तर प्रवाशांनी एका संशयिताला पकडून त्यास चोप दिला. संशयितांनी हिसकावून नेलेल्या बॅगमध्ये 35 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असलेले लहान 20 डबे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांनी पकडलेल्या संशयिताला ताब्यात घेतले. राहुल दिनकर शिंगाडे असे त्याचे नाव आहे. अन्य संशयितांच्या शोधासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती. मात्र पसार झालेले संशयित पोलिसांच्या हाती लागले नाहीत. सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्यासह सहकार्यांनी शिंगाडे याच्याकडे अन्य संशयितांबाबत कसून चौकशी सुरू केली आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली असून बुधवारी रात्रीपर्यंत संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते.
यापूर्वीही घडल्या आहेत लुटीच्या घटना…
पुणे – बंगळूर महामार्गालगत वराडे हद्दीत यापूर्वीही अनेकदा लुटीच्या घटना घडल्या आहेत. श्रावणी हॉटेलसुद्धा रात्री उशिरापर्यंत सुरू असते. या ठिकाणी एसटी, ट्रॅव्हल्स तसेच अन्य वाहने थांबतात. त्यामुळेच या परिसरात अनेकदा गुंडांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असतो, अशी चर्चा आहे. त्यामुळेच वेळेत हॉटेल बंद झाले असते, तर ही घटनाच घडली नसती, अशी चर्चा परिसरातील गावांमध्ये सुरू आहे.