मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ओळखली जाते. तिच्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालती आहे. तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकांच्या मनात घर करून आहे. सोनालीने केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कधीकधी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त गाजतात. असाच एक प्रसंग सोनालीच्या बाबतीत घडला. तिच्या खासगी आयुष्याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या आणि एका विशिष्ट गोष्टीवरून सर्वत्र वादविवाद सुरू झाले होते. याबाबत सोनालीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णी ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्याबाबत पसरलेल्या एका अफवेचा खुलासा केला. सोनालीबाबत एक चर्चा गाजत होती, आणि ती खरी आहे की खोटी, यावरही बराच वादविवाद सुरू होता. त्या वेळी असा दावा केला जात होता की, सोनालीचे एका राजकीय नेत्याशी लग्न झाले आहे. या अफवांवर सोनालीने प्रथमच आपली बाजू स्पष्ट केली.
सोनालीने दिली प्रतिक्रिया
‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात बोलताना सोनालीने तिच्या लग्नाबाबतच्या अफवांवर भाष्य केले. ती म्हणाली, “माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय, आणि त्याने मला राहायला घर दिलंय, अशा चर्चा पसरल्या होत्या. जेव्हा ही अफवा पसरली, तेव्हा मला अनेकांचे फोन येऊ लागले. माझ्या चुलत बहिणीनेही मला फोन करून विचारलं, ‘काय, तुझं लग्न झालंय का?’ मी तिला म्हणाले, ‘अगं, माझं लग्न झालं असतं तर मी तुला लग्नाला बोलवलं नसतं का? तू माझी बहीण आहेस ना!’ ती म्हणाली, ‘नाही, घाईगडबडीत राहून गेलं असेल.’ मी म्हणाले, ‘असं कसं राहील? तू काय बोलतेस!’ मग तिने सांगितलं की, लोक म्हणत आहेत तुझं एका नेत्याशी लग्न झालंय आणि त्याने तुला घर दिलंय. मी काही क्षण थक्क झाले. पण असं काहीच नव्हतं. या केवळ निराधार अफवा होत्या…”