कोल्हापुरातील माधुरी हत्तीणीप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्याने कोल्हापुरातील रहिवाशांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. त्यावरून कोल्हापुरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रशांत भिसे यांनी हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार, असा इशारा दिला आहे. कोल्हापूरवासियांचा अपमान करणाऱ्या विकास पाठकला कोल्हापुरी पायताणाने चोपणार म्हणजे चोपणार असा विडा त्यांनी उचलला आहे. कोल्हापुरी हिसका काय असतो तो तुला दाखवतो, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले प्रशांत भिसे?
“कोल्हापूरचं माधुरी हत्तीण प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. त्याचदरम्यान अजून एक विषय चर्चेत आला आहे, तो म्हणजे रीलस्टार हिंदुस्थानी भाऊने पोस्ट केलेला व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये तो ज्या धनाड्यांनी त्याला पैसे दिले आहेत, त्यांची बाजू घेताना दिसतोय. एवढी मोठी हिंमत आपल्या मराठी माणसांना एक परप्रांतीय येऊन अर्वाच्च भाषेत आई-बहिणींवरून शिव्या देतोय. कोणासाठी तर धनाड्यांसाठी, उद्योगपतींसाठी. मित्रांनो हा हिंदुस्थानी भाऊ म्हणजे विकास पाठक. त्याचं टोपणनाव हिंदुस्थानी भाऊ आहे. हा परप्रांतीय आहे आणि आपल्याला शिव्या देतोय. वाह.. टाळ्या,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
भिसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. “मुख्यमंत्री महोदय, हे तुम्हाला आवडलंय का? आज त्याने अर्वाच्च भाषेत मराठी माणसाला शिवी दिली. तुम्ही मराठी आहात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मला विचारायचं आहे, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालला आहात ना? मग आता बोला ना काहीतरी, करा ना कारवाई,” असं ते म्हणाले.
“हिंदुस्थानी भाऊ, तुला एकच गोष्ट सांगतो. तू कोल्हापूरकरांना शिव्या देण्याचाय भानगडीत पडू नकोस. कोल्हापूरचं प्रॉडक्ट माहितीये का तुला? ही कोल्हापुरी चप्पल, या चपलेनं तुझं तोंड फोडणार म्हणजे फोडणारच. लक्षात ठेव. मराठी माणसांच्या नादी लागू नकोस. ही चप्पल लक्षात ठेव. या चपलेनं तुझं तोंड फोडणार आणि तुला चोपणार,” अशी धमकी भिसेंनी हिंदुस्थानी भाऊला दिली आहे.