आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ असून टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजेंड्स 2025 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. उपांत्य फेरीतही भारत खेळला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं होतं. असं सर्व चित्र असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप स्पर्धेसाठी कोणता संघ निवडला याची उत्सुकता आहे. शुबमन गिल या संघात असेल की नाही? श्रेयस अय्यरचं काय? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. असं असताना सौरव गांगुलीने या स्पर्धेपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. सौरव गांगुलीचं वक्तव्य ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सौरव गांगुलीच्या मते एका खेळाडूच्या या स्पर्धेसाठी संघात समावेश केला पाहीजे. या खेळाडूने एक वर्षापूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टीम इंडियासाठी 17 टी20 सामन्यात त्याने 24.35 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आहेत.
सौरव गांगुली काय म्हणाला?
इंडिया टुडेशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, मुकेश कुमारची निवड आशिया कप स्पर्धेसाठी व्हायला हवी. तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट घेतल्या आहे. त्यामुळे त्याला संधी मिळायला हवी. सध्या टीम इंडिया कसोटी क्रिकेट खेळणार नाही. त्यामुळे त्याची निवड टी20 आशिया कपमध्ये व्हायला हवी. तो सर्व फॉर्मेटचा गोलंदाज आहे. त्याची वेळ नक्कीच येईल. फक्त त्याला धीर धरावा लागेल. मुकेश कुमारने 2023 मध्ये टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी खेळला होता. कसोटीत त्याने 25.57 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या होत्या. तर 6 एकदिवसीय सामन्यात त्याने 43.40 सरासरीने 5 गडी बाद केले होते.
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचं वेळापत्रक
टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. हा सामना युएईविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर वेळापत्रकानुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध 14 सप्टेंबरला सामना होईल. साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमान विरुद्ध 19 सप्टेंबरला खेळला जाईल. 29 सप्टेंबरला अंतिम सामना दुबईत होणार आहे.