जिल्ह्यात गणेश उत्सवात लेसर लाईटस्च्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबतची अधिसूचना काढली असून 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीसाठी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात 27 ऑगस्टपासून गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती आगमन, विसर्जन मिरवणूक तसेच या दरम्यानच्या इतर कार्यक्रमात गणेशोत्सव मंडळांकडून लेसर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या भाविकांच्या डोळ्यावर लेसर लाईट पडल्याने काही व्यक्तींच्या डोळ्याचा पडदा तसेच बुब्बुळाला इजा झाल्या होत्या. यावर्षीही अशा लेसर लाईटचा वापर झाल्यास डोळ्याचा पडदा तसेच बुब्बुळाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुकीत लेसर लाईटचा शो किंवा वापर करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्यये 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत जिल्हादंडाधिकारी येडगे यांनी प्रतिबंध केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असेही या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.