शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील अद्याप सुमारे 406 जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांसाठी 18 ऑगस्टला दुसर्यांदा पुनर्प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.
विद्यापीठातील विविध अधिविभागांतील अभ्यासक्रमांच्या दुसर्या फेरीअखेर 1104 जागा भरल्या आहेत.मात्र, अद्यापही 26 अभ्यासक्रमांच्या 406 जागा अजून रिक्त आहेत. अधिविभागांमधील 28 अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाच्या 1510 जागा आहेत. पहिल्या फेरीमध्ये 837, तर दुसर्या फेरीमध्ये 267 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र, अजूनही 400 हून अधिक जागा रिक्तच आहेत. त्या भरण्यासाठी प्रवेशाची तिसरी फेरी व पुनर्प्रवेश परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने तिसरी फेरी घेण्यास मान्यता दिली आहे. 18 ऑगस्ट रोजी विद्यापीठात पुनर्प्रवेश परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे. प्रवेश परीक्षा नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.
एम.एस्सी केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झूलॉजी, स्टॅस्टेस्टिक मॅथेमॅटिक्स/ मॅथेमॅटिक्स कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (केवळ कॉलेज), इलेक्ट्रॉनिक्स, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, एन्व्हायन्मेंटल सायन्स, अॅग्रो केमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, योगशास्त्र, बी.एस्सी. एम.एस्सी. इकॉनॉमिक्स, नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी, एमएसडब्ल्यू, एमबीए रूरल मॅनेजमेंट, एम.ए. मास कम्युनिकेशन, एम.एस्सी. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जिओ इन्फॉरमॅटिक्स, एम. ए. ट्रॅव्हल अँड टुरिझम, रशियन, बी.जे., एम.जे., एम.एस्सी. इकॉनॉमिक्स या विषयांचे पुनर्प्रवेश होणार आहेत.
सीमा भागातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत
शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेणार्या सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशात विशेष सवलत देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिक माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर पाहता येणार आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.