गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनची गती मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार भारताच्या उत्तर, पश्चिम, मध्य आणि काही ठिकाणी दक्षिण भागामध्ये मान्सून कमजोर झाला आहे. मात्र वातावरणाची ही सामान्य स्थिती आहे, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. मात्र ही स्थिती जर लांबली तर चिंता वाढू शकते, परंतु सध्या तरी तसं चित्र दिसत नाहीये.
पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.12 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो, 13 ऑगस्टला हे क्षेत्र आणखी मजबूत होईल. सध्याची हवामानस्थिती या कमी दाबाच्या पट्ट्याला अनुकूल आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देशभरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असं स्कायमेटनं म्हटलं आहे.
पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा
पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर दुसरीकडे याचा परिणाम म्हणून छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गोवामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजस्थान आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस
ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात राजस्थान आणि गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत होऊ शकते, या पार्श्वभूमीवर या दोन राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहार या तीन राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर इतरही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, सध्या राज्यात पावसाचा जोर थोडा मंदावला आहे, मात्र पुढील आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.