राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन आणि धार्मिक उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीचे पावित्र्य जपण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने शहरात महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, श्री. राजेश भगत यांनी हा आदेश निर्गमित केला आहे. यानुसार, नागपूर महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला या विशिष्ट दिवशी मांस विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे काटेकोरपणे पालन होते की नाही, हे तपासण्यासाठी मनपाची विशेष भरारी पथके शहरात गस्त घालणार आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जे व्यावसायिक किंवा विक्रेते या नियमांचे उल्लंघन करताना आढळतील, त्यांच्यावर महानगरपालिकेच्या नियमांनुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रशासनाने सर्व संबंधित व्यावसायिकांना या आदेशाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे मांसाहारी खवय्यांची काहीशी गैरसोय होण्याची शक्यता आहे. तथापि, सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असल्यामुळे अनेक नागरिक मांसाहार टाळतात. त्यामुळे शहरातील मांस विक्रीत आधीच घट झालेली असून, या बंदीचा व्यवसायावर मर्यादित परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.