मुंबई द्रुतगती मार्गावर वाहन चालकांना लुबाडणाऱ्या अर्थात हफ्तेखोरी करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला बेदम चोप देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसांच्या (Traffic) सांगण्यावरून पैसे वसूल केल्याचं, ट्रॅफिक वॉर्डनने मान्य केल्यानंतर या ट्रॅफिक वॉर्डनला प्रवाशांनी चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video viral) झाला आहे. वॉर्डनच्या मारहाणीचा आणि कबुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. संतप्त नागरिकांनी उर्से टोल नाक्यावर रंगेहात पकडून त्या वॉर्डनला चांगलाच धडा शिकवला. तसेच, 500 रुपये कोणाच्या आदेशाने वसूल केले? असा प्रश्न संतप्त नागरिकांना विचारला असता, सुरुवातीला केवळ साहेबांच्या आदेशाने म्हणणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनने नागरिकांचं त्रागा पाहून सगळी कबुली दिली.
ट्रॅफिक वॉर्डनने संतप्त, आक्रमक नागरिक पाहून कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच नाव घेतलं. त्यानतंर, संतप्त नागरिकांनी त्यांचा मोर्चा त्या वाहतूक पोलिसाकडे वळवला. हा व्हिडीओ पिंपरी चिंचवड पोलिसांकडेही पोहचला आहे. त्यानंतर याप्रकरणी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, संबंधित वॉर्डनला नोकरीवरून काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटील यांनी दिली. या घटनेने पोलीस खात्याची प्रतिमा आणखी मलीन झाली आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून कशाप्रकारे नागरिकांना छळलं जातं, आर्थिक पिळकवणूक केली जाते हेही समोर आलंय.
पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चालकांकडूनही ट्रॅफिक वॉर्डन सर्रासपणे खंडणी वसुल करतात. मुळात वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या वेतनासाठी 5 कोटींचा खर्चही केला जातोय. मात्र, प्रत्यक्षात या ट्रॅफिक वॉर्डनकडून शहरवासीयांच्या खिशावर डल्ला मारला जातो. त्यामुळं या ट्रॅफिक वॉर्डनला खंडणीखोरीचं लायसन्स नेमकं कोणी दिलं? त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे का दाखल केले जात नाहीत? हा खरा प्रश्न आहे. या संदर्भात पालिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्य उदय जरांडे यांनी आपली बाजू मांडली.
तक्रार आल्यास सूचना देऊ – जरांडे
ट्रॅफिक वॉर्डनला मदतीसाठी देण्यात आलं आहे, वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या आधीन त्याचं सगळं नियंत्रण असतं. तेच वाहतुकीचं नियंत्रण करतात, त्यांची ड्युटी देखील तेच लावत असल्याचं उदय जरांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. ट्रॅफिक वॉर्डनसंदर्भात आमच्याकडे तक्रारी आली नाही, पण तक्रार आल्यास नक्कीच त्यांना सूचना दिल्या जातील. यासंदर्भाने गुन्हा दाखल करण्याचा किंवा कारवाईचा अधिकार हा पोलिसांचा आहे, त्यामुळे तेच याबाबत निर्णय घेतील, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.