गंगानगर येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसंदर्भातील 11 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी कोल्हापुरात सुरू होणार्या सर्किट बेंचकडे वर्ग केली आहे.
येथून पुढे सर्किट बेंचपुढे सुनावणी होणार आहे. त्यामुळे कारखाना निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे.
सत्ताधारी पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात महिन्यांपूर्वी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, सहकार निवडणूक प्राधिकरणाने त्यास मान्यता न देता फेरनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. पी. एम. पाटील गटाने न्यायालयात न जाता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन प्रचारास सुरुवात केली होती. दरम्यान, 19 एप्रिल रोजी बाबासाहेब मगदूम व इतर यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, यानंतर न्यायालयात केवळ तारखाच पडत गेल्या. दि. 11 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली होती. मात्र, कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कामकाजास 18 ऑगस्टपासून सुरुवात होत असल्याने न्यायालयाने ही सुनावणी सर्किट बेंचकडे वर्ग केली आहे.
उच्च न्यायालयाने 23 एप्रिल रोजीच्या निकालामध्ये सुनावणी होईपर्यंत कारखान्यावर प्रशासक नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश 30 एप्रिलला प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे निकाल लागेेपर्यंत कारखान्यावर प्रशासक येण्याची शक्यता मावळली आहे.