चार दिवसांपूर्वी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना कर्नाटकमधल्या विविध ठिकाणी आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी सदर महिलेच्या जावयासह तिघांना अटक केली आहे. या महिलेचा जावई पेशाने दंत चिकित्सक आहे.
ज्या महिलेच्या मृतदेहाचे १९ तुकडे सापडले त्या महिलेचं नाव लक्ष्मी देवी होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
कर्नाटकातल्या तुमाकुरु जिल्ह्यात पोलिसांनी तिघांना अटक केली. डॉ. रामचंद्रय्या, सतीश के एन, किरण के अशा तिघांना या हत्या प्रकरणात अटक करम्यात आली आहे. रामचंद्रय्याचा विवाह लक्ष्मी देवी यांची मुलगी तेजस्वीसह झाला. मात्र हा त्याचा दुसरा विवाह होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ ऑगस्टला मुलीकडे जायचं म्हणून लक्ष्मीदेवी घरुन निघाल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे पती बसवराज यांनी पत्नी लक्ष्मी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस लक्ष्मी यांचा शोध घेत होते. त्यांना एका महिलेच्या मृतदेहाचे १९ तुकडे सापडले. या तुकड्यांची जेव्हा ओळख पटवण्यात आली तेव्हा ते लक्ष्मीदेवी यांचेच आहेत असं कळलं. मृतदेहाचे तुकडे पिशव्यांमध्ये फेकण्यात आले होते.
सुझुकी ब्रिझा कारमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवून नंतर फेकण्यात आले
या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. तसंच कोटरगेट पोलीस ठाण्याने विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत कळवण्यात आलं. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली अशीही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मारुती सुझुकी ब्रिझा या कारचा वापर करण्यात आला होता. सतीश नावाच्या माणसाच्या नावावर ही कार होती. सतीशला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर किरण नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या दोघांची चौकशी केल्यावर रामचंद्रय्याचा या हत्येतला सहभाग पोलिसांना समजला. रामचंद्रय्या तेव्हा धर्मशाला या ठिकाणी गेला होता. तसंच तो चौकशीसाठी बोलवूनही आला नाही त्यावेळी पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवला तेव्हा रामचंद्रय्याने गुन्हा कबूल केला. लक्ष्मी देवी मुलीला सल्ले देत होत्या त्यामुळे संसारात अडचणी येत होत्या आणि वाद वाढत होते म्हणून त्यांना ठार केलं असा जबाब रामचंद्रय्याने दिला. ज्यानंतर त्याला आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
रामचंद्रय्या आणि त्याच्या साथीदारांना अटक
लक्ष्मीदेवी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे रामचंद्रय्याने आणि त्याच्या साथीदारांनी केले आणि ते विविध भागांमध्ये फेकले. या प्रकरणात जी कार आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली तो सर्वात मोठा पुरावा होता. कारण त्यामुळेच आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहचू शकलो असंही पोलिसांनी सांगितलं.