देशभरात 79 व्या स्वातंत्र्यदिनाची जोमात तयारी केली जात आहे. देशभरात सजावट केली जातेय. मुंबई शहरही आता नटले आहे. रेल्वे स्थानकांवर रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. असे असतानाच आता रेल्वेगाडी थेट बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणारा कॉल मुंबई पोलिसांना आला आहे. अज्ञात व्यक्तीने ही धमकी देऊन कॉल डिस्कनेक्ट केल्याचे समोर आले आहे. या एका कॉलमुळे आता मुंबई पोलीस हायअलर्टवर मोडवर गेले आहेत. पोलिसांकडून सर्वत्र योग्य ती काळजी घेतली जात आहे.
नेमकी माहिती काय समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात एक धमकीचा फोन कॉल आला आहे. 15 ऑगस्टच्या एक रात्र अगोदर हा कॉल आल्याने सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सूत्रांच्या माहिती प्रमाणे कॉल करणाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून ट्रेनमध्ये मोठा बॉम्बस्फोट होणार आहे असे सांगितले आणि लगेच कॉल डिस्कनेक्ट केला.
सायंकाळी साडे सहा वाजता आला होता कॉल
सूत्रांनी पुढे दावा केला की, पोलिसांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा त्याच नंबरवर कॉल केला तेव्हा तो फोन नंबर बंद होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा कॉल आज संध्याकाळी 6.30: वाजता मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आला. या कॉलनंतर ही माहिती रेल्वे पोलिसांनाही देण्यात आली होती. परंतु आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
पाकिस्तानात स्वातंत्र्यदिना बेछूट गोळीबार, आता भारतातही धमकी
भारतात 15 ऑगस्ट रोजी तर पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. मात्र पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्ट रोजीच कराचीमध्ये अज्ञात व्यक्तीने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. या गोळीबारात एकूण 64 जण जखमी झाले आहेत. कराचीत अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आता मुंबईतही बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीच्या कॉलला महत्त्व प्राप्त झाले आहे.