जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक ढगफुटी झाली. मचैल माता मंदिरा यात्रा मार्गावर ही आपत्ती कोसळली. यात दोन CISF जवानांसह आतापर्यंत 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. 70 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. या घटनेमुळे अचानक पूर आला आणि मोठ्या प्रमाणात विद्ध्वंस घडला. 100 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. 37 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलय. जवळपास 70 ते 80 जणांवर पड्डारच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
मचैल माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गातील चशोती गावावर ही आपत्ती आली. ही दुर्घटना घडली त्यावेळी मचैल माता यात्रेसाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. 9500 फूट उंचावरील मचैल माता मंदिरात जाण्यासाठी यात्रेकरुन चशोती गावापर्यंत वाहनाने येऊ शकतात. त्यानंतर त्यांना 8.5 किलोमीटरचा रस्ता पायी चालावा लागतो. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 38 लोकांच्या मृत्यूची पुष्टि झाली आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भिती आहे. आतापर्यंत 100 लोकांना वाचवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास 200 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
काय-काय नुकसान झालं?
चशोती गाव किश्तवाड शहरपासून जवळपास 90 किलोमीटर दूर आहे. इथे यात्रेकरुंसाठी सुरु केलेलं लंगर (सामुदायिक स्वयंपाकघर) या घटनेमध्ये सर्वाधिक प्रभावित झालं. ढगफुटीमुळे अचानक पूर आला. त्यामध्ये दुकानं, सुरक्षा चौकीसह अनेक इमारती वाहून गेल्या. किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांनी आपत्ती आल्यानंतर लगेच बचाव पथकाला रवाना केलं. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांसह स्वत: सुद्धा पंकज कुमार शर्मा घटनास्थळी पोहोचले व मदत बचाव कार्याचा आढावा घेतला.
मंदिराची वार्षिक यात्रा स्थगित
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “या घटनेनंतर मंदिराची वार्षिक यात्रा स्थगित करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत” एनडीआरएफच्या दोन टीम्स उधमपुरहून किश्तवाडला पाठवण्यात आल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरु केल्याची माहिती उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांनी दिली. डोंगरात तलहटी येथे वस्ती आहे, तिथे अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
‘ढगफुटीच्या घटनेमुळे मी व्यथित’
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेत झालेल्या जिवीतहानी बद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी एक्सवर लिहिलय की, “किश्तवाडच्या चशोतीमध्ये ढगफुटीच्या घटनेमुळे मी व्यथित आहे. ज्यांनी आपल्या स्वकीयांना गमावलं, त्या कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा, यासाठी प्रार्थना करतो” पोलीस, सैन्य, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.