इंडिया वूमन्स टीमने इंग्लंड दौऱ्यात हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी करत टी 20i नंतर वनडे सीरिजवर कब्जा केला. मात्र त्यानंतर इंडिया ए वूमन्स टीमची निराशा झाली. ऑस्ट्रेलिया ए वूमन्सने इंडिया ए वूमन्सचा टी सीरिजमध्ये 3-0 ने धुव्वा उडवला. मात्र त्यानंतर इंडिया ए वूमन्स टीमने जोरदार पलटवार करत कांगारुंचा सलग 2 वनडे मॅचमध्ये पराभव करत मालिका आपल्या नावावर केली. त्यामुळे भारताकडे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून कांगारुंचा हिशोब करण्याची संधी होती. मात्र भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता विजयाने करण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात धमाकेदार विजय मिळलून भारताला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. त्यामुळे भारताला 2-1 अशा फरकाने समाधान मानावं लागलं.
तिसऱ्या सामन्यात काय झालं?
उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी 17 ऑगस्ट रोजी ब्रिस्बेनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी निराशा केली. भारताला 220 पारही पोहचता आलं नाही. दुर्देव म्हणजे भारताला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाने भारताला 47.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. ओपनर शफाली वर्मा, यास्तिका भाटीया आणि नंदीनी कश्यप या जोडीने केलेल्या खेळीमुळे भारताला 200 पार पोहचता आलं. भारताचा डाव 216 धावांवर आटोपला.
शफाली वर्मा हीने 59 चेंडूत 52 धावा केल्या. यास्तिका भाटीया हीची अर्धशतकांची हॅटट्रिक हुकली. यास्तिकाने 42 धावांचं योगदान दिलं. तर नंदीनी कश्यप हीने 28 धावा केल्या. तर इतरांना फार काही करता आलं नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 217 धावांचं माफकं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 133 बॉलआधी फक्त 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं.
एलिसा हेली आणि ताहिला विल्सन ही सलामी जोडी ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या नायिका ठरल्या. या दोघींनी 137 धावांची सलामी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने ताहिला विल्सनच्या रुपात पहिली आणि एकमेव विकट गमावली. राधा यादवने ताहिलाला आऊट केलं. ताहिलाने 51 बॉलमध्ये 8 फोरसह 59 रन्स केल्या.
त्यानंतर एलिसा आणि रचेल ट्रेनामन या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. रचेलने नाबाद 21 धावा केल्या. तर एलिसाने 84 चेंडूत 163.10 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 137 धावा केल्या. एलिसाने या खेळीत 3 षटकार आणि तब्बल 23 चौकार लगावले.