अखंड बरसणारा पाऊस तरीही जमलेली प्रचंड गर्दी, रॉक बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि पावसातही ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी अशी ओळख निर्माण झालेल्या राहुल आवाडे युवा सेनेची 3 लाख 11 हजाराची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने फोडली. यावेळी अत्याधुनिक विद्युत रोषणाई, भव्य स्क्रीन, चित्ताकर्षक आतषबाजी आणि आकर्षणाचा केंद्र ठरलेला रॉक बॅन्ड शो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
राहुल आवाडे युवा सेना यांच्या वतीने सोमवारी स्टेशन रोडवरील केएटीपी च्या मैदानात हा दहीहंडी फोडण्याचा सोहळा संपन्न झाला. विजेत्या गोविंदा पथकास तब्बल 3.11 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. स्पर्धेचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे व श्रीकृष्ण प्रतिमेचे तसेच दहीहंडीचे पुजन करुन करण्यात आले. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील 5 संघ सहभागी झाले होते. सुरुवातीला सहभागी गोविंदा पथकांनी 6 थर रचत सलामी दिली. त्यानंतर चिठ्ठीद्वारे क्रमांक निश्चित करत दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
चिठ्ठी काढल्यानंतर क्रमांकानुसार पहिल्यांदा गोडी विहीर पथकाला संधी मिळाली. त्यामध्ये त्यांनी सहा थर रचले. त्यानंतर हंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरु होते. सुरुवातीला 40 फुटावर असलेली दहीहंडी दोन प्रयत्नानंतर 9 फुटानी खाली घेत ती 31 फुटावर घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा चिठ्ठी काढल्यानंतर त्यामध्ये जय हनुमान पथकाला पथकाला संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व पथकानी प्रयत्न केले. अखेर सहा थर रचत जय महाराष्ट्र या मंडळाच्या ओंकार यादव या गोविंदाने दहीहंडी फोडली.
यावेळी दहीहंडीचे क्षण टीपण्यासाठी मोबाईलवर चित्रीकरण करण्यात तरुणांसह लहान बालकेही मग्न होती. यावेळी प्रथमच रॉक बॅन्ड शो हा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानेही स्पर्धेत रंग भरत उपस्थित प्रेक्षकांना मोहित केले. तर स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले.
यावेळी मोश्मी आवाडे, दिया आवाडे, राजू बोंद्रे, सतिश मुळीक, नितेश पोवार, दिपक सुर्वे, इम्रान मकानदार, नाना पाटील, शेखर शहा, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, प्रकाश दत्तवाडे, बाबासो चौगुले, तानाजी पोवार, बाळासाहेब कलागते पै. अमृत भोसले, वृषभ जैन, महेश पाटील, धनंजय टारे, चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण तोतला, अरविंद शर्मा, प्रसाद खोबरे यांच्यासह विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामीण भागातील पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.