मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने परिस्थिती खराब आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 18 व 19 ऑगस्टसाठी आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्याच वेळी, नांदेड जिल्ह्यात 200 हून अधिक लोक अडकले होते, ज्यांच्या बचावासाठी सैन्याला पाचारण करावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
पाणी साचणं, भूस्खलन आणि बचाव अभियान
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी आणि बोरिवलीमध्ये अवघ्या तीन तासांत 50 मिमी पेक्षा जास्त पाणी साचले. पुढील काही तासांत बोरिवली ते चर्चगेटपर्यंतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर कल्याणमधील जय भवानी नगर भागातील नेतिवली टेकडीवर भूस्खलन झाले, त्यानंतर स्थानिक रहिवाशांना जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत हलवण्यात आले. त्यांच्यासाठी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने येथे लष्कर आणि एनडीआरएफ पथके तैनात केली आहेत.
पिकं उद्ध्वस्त, 800 गावं बाधित
मंत्रालयातील आपत्कालीन केंद्रातून परिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्रिी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडला. विदर्भात दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकं नष्ट झाली आणि 800 गावं बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत 8 तासांत 170 मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे 14 ठिकाणी पाणी साचले, मात्र फक्त दोन ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.
पुढील 10 ते 12 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत असे ते म्हणाले. मराठवाडा विभागात गेल्या पाच दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि 205 पशुधन मृत्युमुखी पडले आहे.
आदित्य ठाकरेंचा BMC आणि सरकारला सवाल
सततचा पाऊस आणि पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत असून, याच दरम्यान, शिवसेना (उबाठा गटाचे) नेते आदित्य ठाकरे यांनी बीएमसीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, एका घोटाळ्यामुळे मुंबईतील रस्त्यांची अवस्था वाईट आहे आणि पावसात लोकांना अडचणी येत आहेत. निवडणुका न घेतल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकार बीएमसीवर नियंत्रण ठेवत आहे आणि त्यात जबाबदारीचा अभाव आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला
मात्र सर्व एजन्सीज परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलं.
अंधेरीत गाड्या बुडण्याचं सत्र सुरूच
पावसामुळे पाणी साचून मुंबईतील वीरा देसाई परिसरातील परिस्थिती कालपेक्षा आज वाईट झाली आहे. या हाय प्रोफाइल भागात सर्वत्र पाणीच पाणी आहे. काल या भागात फक्त गुडघ्यापर्यंत पाणी होते पण आज पाणी कंबरेपर्यंत पोहोचले आहे. दोन मर्सिडीज कार पाण्यात बुडाल्या होत्या, आज या पाण्यात आणखी चार गाड्या बुडाल्या आहेत. वीरा देसाईचा हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे, सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत आहे. आजूबाजूच्या सर्व भागातील सर्व सोसायट्यांमधील सर्व खालच्या घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.