Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रमहावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका; राधानगरीत विजेच्या धक्क्याने दोन म्हैशी ठार

महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका; राधानगरीत विजेच्या धक्क्याने दोन म्हैशी ठार

वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या विद्युत खांबाची माहिती देऊनही वीजपुरवठा बंद न करण्याच्या महावितरणच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे एका शेतकऱ्याच्या दोन दुभत्या म्हैशींचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

 

मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेत शेतकरी केरबा पाटील हे थोडक्यात बचावले असून, या प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

 

सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे दुर्गमानवाड-नानापाटील वाडी परिसरात विजेचा खांब उन्मळून पडला होता आणि जिवंत विद्युत वाहिन्या जमिनीवर पसरल्या होत्या. मंगळवारी सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी कसबा तारळे येथील महावितरणच्या उपकेंद्रात संपर्क साधून तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

 

नेमके काय घडले?

 

दुपारी साडेबाराच्या सुमारास, शेतकरी केरबा ज्ञानू पाटील हे आपल्या दोन म्हैशींना चारण्यासाठी गोंड्याची मळी परिसरात घेऊन गेले. जमिनीवर पडलेल्या विद्युत वाहिनीचा त्यांना अंदाज आला नाही. पुढे चालत असलेल्या दोन्ही म्हैशींचा या जिवंत तारेला स्पर्श होताच, त्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा तडफडून मृत्यू झाला. सुदैवाने, केरबा पाटील काही अंतर मागे असल्याने ते या भीषण दुर्घटनेतून थोडक्यात बचावले.

 

ग्रामस्थांचा संताप आणि कारवाईची मागणी

 

या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला, त्यानंतर अखेर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. “जर सकाळीच आमची सूचना गांभीर्याने घेतली असती, तर हा अनर्थ टळला असता,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, संबंधित हलगर्जी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश धायगुडे आणि डॉ. जे. पी. डांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ‘गोकुळ’चे संचालक अभिजित तायशेटे यांनीही भेट देऊन पीडित शेतकऱ्याला महावितरणकडून भरपाई मिळवून देण्यासह ‘गोकुळ’कडूनही आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -