पावसाचा जोर ओसरल्याने कोयना, चांदोली धरणातील विसर्ग कमी करण्यात आल्याने सांगलीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या महापुराचा धोका निवळण्याची चिन्हे आहेत. कृष्णा नदीची पाणीपातळी आज मध्यरात्रीपासून उतरण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कृष्णा व वारणा नदीतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत होती. शुक्रवारी सायंकाळी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ४३ फूट ५ इंचावर (धोका पातळी ४५ फूट) पोहोचली असून यामुळे सूर्यवंशी प्लॉट, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड पटवर्धन कॉलनी, जामवाडी आदी ठिकाणची कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली. अनेक कुटुंबांनी नातेवाइकांच्या घरी स्थलांतर केले आहे, तर महापालिकेनेही पूरग्रस्तांसाठी सहकार भवनमध्ये निवारा केंद्र सुरू केले असून या ठिकाणी त्यांची निवास, भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
पश्चिम घाटात गेल्या ४८ तासांपासून पावसाचा जोर ओसरला असून यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयनेतून बुधवारपर्यंत होत असलेला ९५ हजार ३०० क्युसेकचा विसर्ग शुक्रवारी सकाळी ८२ हजार १०० करण्यात आला आहे, तर चांदोली धरणातील विसर्ग ३४ हजार २५७ वरून १५ हजार ३६९ क्युसेक करण्यात आल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका तूर्त टळला आहे.
पुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले आहे. महापालिकेचे अग्निशमन पथक, पोलीस आणि प्रशासन जिल्हाधिकारी अशोक काकडे, आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या देखरेखीखाली २४ तास सतर्क आहे. याशिवाय एनडीआरएफचे पथकही सांगलीसह शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यात सतर्क ठेवण्यात आले आहे. महापूर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी कृष्णा काठावर होत असून अतिउत्साही तरुणांकडून चित्रफीत तयार करण्यासाठी स्टंटबाजी करण्यास रोखण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेने घेतली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुराच्या पाण्यात पोहण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे.
वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेकडो एकर उभ्या पिकात पाणी शिरले असून गेल्या तीन दिवसांपासून पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे ऊस, भात, सोयाबीन पिके हातची गेली आहेत. आज सकाळी भिलवडी येथील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मौलानानगर हा भिलवडीतील नदीकाठचा भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते व महसूल यंत्रणा प्रयत्नशील आहे.