Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगबैलपोळ्याचा आनंद क्षणात हिरावला! बैलांना नदीवर घेऊन गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

बैलपोळ्याचा आनंद क्षणात हिरावला! बैलांना नदीवर घेऊन गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

अकोल्यातून (Akola) एक दु:खद बातमी समोर येत आहे. बैलपोळ्याचा आनंद क्षणात हिरवल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. बैलपोळ्याच्या अनुषंगाने बैलांना नदीत अंघोळीसाठी घेऊन गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या खोळद गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. शंतनू अविनाश मानकर असं या नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे.

 

अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे खोळद गावात हळहळ व्यक्त होत आहे. तर मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. घटनास्थळी भाजपचे आमदार हरीश पिंपळे आणि पोलीस दाखल झाले होते. काटेपूर्णा येथील वीर भगतसिंग आपातकालीन शोध व बचाव पथकाकडून पेढी नदीत वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधार्थ शोध कार्य सुरु आहे.

 

नवनीत राणानी केली बैलजोडीची पूजा…

आज बैलपोळ्याचा सण आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील कष्ट, त्याग आणि निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचं प्रतीक म्हणजे बैलपोळा. हा दिवस बळीराजाच्या जगण्याला बळ देणाऱ्या बैलाच्या उपकारांची आठवण करुन देतो. सर्जा-राजाला सजवून, त्याचा सन्मान करुन शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देखील आपल्या फार्म हाऊसवर बैलजोडीची पारंपरिक पूजा करुन पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घातला.

 

बैलावर लिहले सातबारा कोरा कोरा

बैल पोळ्याच्या सणात बैलावर सातबारा कोरा कोरा असे कर्जमाफीचे संदेश लिहण्यात आले आहेत. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या आवाहनाला अमरावती जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला आहे. वलगाव येथील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात साध्या पद्धतीने हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात आला. बैलांना कुठल्याही प्रकारे सजावट न करता कर्जमाफीचा संदेश बैलाच्या पाठीवर लिहण्यात आला होता.

 

यंदा बैल पोळा आज म्हणजेच शनिवारी, 22 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जात आहे. बैल पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी श्रावण महिना समाप्त होतो. वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा आणि काही दक्षिणेकडील भागात साजरा होतो. याला “पिठोरी अमावस्या” किंवा “पोल्या” असेही म्हणतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -