Saturday, August 23, 2025
Homeइचलकरंजीकोल्हापूर शहरात पूर ओसरला; शिरोळमध्ये चिंता, नृसिंहवाडी, इचलकरंजीत नागरी वस्तीत पाणी; अशी...

कोल्हापूर शहरात पूर ओसरला; शिरोळमध्ये चिंता, नृसिंहवाडी, इचलकरंजीत नागरी वस्तीत पाणी; अशी असेल पाऊस स्थिती

पंचगंगेची पातळी ४२ फूट दोन इंचांवर; दिवसभरात पाऊण फुटाने घटकोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग खुला

 

जिल्ह्यात २६९ कुटुंबांचे, २१२ जनावरांचे स्थलांतर

 

जिल्ह्यातील ७६ मार्ग बंद; ४७ बंधारे पाण्याखालीपावसाची उघडझाप;कडकडीत ऊन

 

आलमट्टीतून अडीच लाख क्युसेक विसर्ग कायम

 

Kolhapur Flood News Today : शहर आणि परिसरातील पूर हळूहळू ओसरू लागला आहे, मात्र शिरोळमध्ये नृसिंहवाडी-कुरुंदवाड, नृसिंहवाडी, हेरवाड या गावांतील काही भागांत आणि इचलकरंजी नागरी वस्तीत पाणी घुसल्याने धोका कायम आहे. येथील नागरिकांसह जनावरांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

आज दिवसभरात शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्यासह इचलकरंजी शहरातील २६९ कुटुंबांना व २१२ जनावरांना स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान, केर्ले व आंबेवाडी येथील पाणी कमी झाल्याने कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला झाला. अद्याप जिल्ह्यातील ७६ मार्ग बंद असून, ४७ बंधारे पाण्याखाली आहेत. आज दिवसभरात पावसाची पूर्णपणे उघडीप राहून कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

 

जिल्ह्यात पावसाने कालपासून उघडीप दिल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. शहरातील पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे, परंतु शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. आज दिवसभरात कुरुंदवाड, शिरोली पुलाची, घुणकी, खोची येथे घरात पाणी घुसल्याने नागरिकांसह जनावरांचे निवारा केंद्रात स्थलांतर केले. पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात पाऊण फुटाने घटून, ती रात्री ४२ फूट दोन इंचांवर पोहोचली. सध्या ती धोक्याच्या खाली आली असली तरी पुराचे संकट कायम आहे.

 

राधानगरी धरणाचा एक दरवाजा अद्याप खुला असून, त्यामधून २९२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर आलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक विसर्ग कायम असून, कोयनेतून एक हजार क्युसेक, हिप्परगीमधून दोन लाख २५ हजार ९५० क्युसेक विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर कमी झाल्याने केर्ली येथील रस्त्यावरील पुराचे पाणी ओसरून आज कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग खुला झाला. त्यामुळे या मार्गावरील दोन दिवसांपासून बंद असलेली वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, पावसामुळे जिल्ह्यातील ९९ घरांच्या भिंतींची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

इचलकरंजीत नागरिकांसह जनावरांचे स्थलांतर

 

इचलकरंजी पुराचे पाणी शेळके मळा परिसरात आले असून, कटके गल्लीतील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३० कुटुंबातील ९६ नागरिकांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे, यामध्ये ३८ पुरुष, ४९ महिला व ९ लहान मुलांचा समावेश आहे, तर ७३ जनावरांनाही अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. सायंकाळनंतर मात्र पूर पातळी स्थिर राहिली आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

 

महापालिकेने तब्बल पूरग्रस्तांसाठी ४२ छावण्यांची सोय केली आहे, पण अद्याप एकही पूरग्रस्त नागरिक महापालिकेच्या छावणीत दाखल झालेला नाही, मात्र ७३ पैकी ०९ जनावरे नाट्यगृहातील छावणीत दाखल झाली आहेत, तर उर्वरित जनावरे सोयीच्या ठिकाणी हलविण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे.

 

शिरोळ तालुक्यात आज दिवसभर पाण्याची पातळी सहा इंचाने वाढली. कृष्णा, पंचगंगा नद्यांना मोठा पूर आला असून कुरुंदवाड- शिरढोण, हेरवाड अब्दुललाट, अकिवाट- मजरेवाडी, बस्तवाड -अंकिवाट, शिरोळ-नांदणी, शिरढोण- नांदणी, कुरुंदवाड- नांदणी, जुने दानवाड- एकसंबा, घोसारवाड- सदलगा असे अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे. कुरुंदवाड, नृसिंहवाडी, हेरवाड या गावांतील काही भागांत पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

 

कुरुंदवाड एसटी आगारातही पुराचे पाणी शिरले आहे. कलगार वसाहत गोंधळी गल्ली कोरवी गल्ली गोठणपूर गल्लीमधील नागरिकांना पालिका प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. पुरामुळे शेकडो हेक्टरातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज दिवसभर पावसाने पूर्ण उसंत घेतली असून, त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्गसुद्धा थांबवण्यात आल्याने पाण्याची पातळी स्थिरावली असून, पूर ओसरण्यास सुरू होण्याची शक्यता आहे.

 

नृसिंहवाडीतील पंचवीस घरांत पाणी

 

नृसिंहवाडी येथील अनेक परिसरात महापुराचे पाणी नागरी वस्तीत शिरल्यामुळे सुमारे चाळीस कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये बौद्धनगर, वेदभवन परिसर, बाबर प्लॉट येथील अनेक कुटुंबांच्या घरी महापुराचे पाणी आल्यामुळे त्यांनी आपले प्रापंचिक साहित्य अन्यत्र हलवले आहे. दरम्यान काल, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पूरस्थितीचे पाहणी करून महापुराची पाणी पातळी कमी होईल, असे आश्वासन दिले आहे.

 

दरम्यान, संभाजीनगरजवळ ओतवाडी भागात पाणी आले आहे. बौद्धनगरमधील सुमारे दहा घरांत पाणी आल्यामुळे बौद्धभवनमध्ये स्थलांतरित केले आहे; तसेच दत्ततीर्थजवळ परिसरातील सुमारे सात ते आठ फूट पाणी आहे. येथे परिसरातील पंचवीस एकघरे पाण्याखाली गेली आहेत. संगम घाट भागात परिसरात पाणी आल्यामुळे यांनी सुरक्षित ठिकाणी आपले साहित्य ठेवले आहे. दत्तमंदिर पूर्ण पाण्याखाली गेले आहे. एकूणच मिठाई व्यापाऱ्यांची लगबग मंदावली आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५.७ मि.मी. पाऊस

 

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३०.८ मि.मी. पाऊस पडला आहे. तसेच हातकणंगले- ३.४, शिरोळ -२.३, पन्हाळा-७.४, शाहूवाडी- ८.६, राधानगरी- १३.३, करवीर-७, कागल- ३.७, गडहिंग्लज-२.३, भुदरगड- ४.७ , आजरा- ४.३, चंदगड-१.२ मि.मी. इतका पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यातील ७६ मार्ग बंद; ४७ बंधारे पाण्याखाली

 

जिल्ह्यात अद्याप पूरस्थिती असल्याने आठ राज्य मार्ग, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ इतर जिल्हा मार्ग, ३१ ग्रामीण मार्ग बंद आहेत, तर पंचगंगा नदीवरील सात, भोगावतीवरील सहा, तुळशीवरील तीन, कासारीवरील पाच, कुंभीवरील दोन, वारणेवरील नऊ, कडवीवरील तीन, दूधगंगेवरील सात, वेदगंगेवरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

 

धरणांतील पाण्याचा विसर्ग (क्युसेकमध्ये)

 

राधानगरी- २९२८, घटप्रभा- २५३२, वारणा- १६३०, दूधगंगा- ६१००, धामणी- ५१२४, कासारी- ८००, कडवी- ४९८, कुंभी- ३००, सर्फनाला- ३४१, जंगमहट्टी- ३३५, पाटगाव- ६४१, जांबरे- ३८६, आंबेओहोळ- २५९

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -