महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता, राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला, शेतात पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायाला मिळालं. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे, मात्र अजूनही पावसाचा धोका टळलेला नाहीये. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या नव्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर कोकणातील रायगड आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर तसेच नांदेड या जिल्ह्यांना आज पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्यावेळी बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा निर्माण झाला होत्या, त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, पावसानं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाब च्या परिसरात सक्रिय असणार आहे. त्याचा परिणाम म्हणून येत्या 25 ऑगस्टपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 25 ते 28 ऑगस्टदरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
दरम्यान पुढील पाच दिवस हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील 24 तासांमध्ये रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पाऊस झाला, त्यानंतर दोन दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.