Sunday, August 24, 2025
Homeकोल्हापूरमहागणपतीचे जल्लोषात आगमन

महागणपतीचे जल्लोषात आगमन

ढोल ताशांचा गजर, आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, मोरया मोरया… असा अखंड जयघोष अशा भक्तिमय वातावरणात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या 21 फुटी महागणपतीचे शनिवारी उत्साहात आगमन झाले.

 

महागणपती पाहण्यासाठी दसरा चौकात भक्तांनी मोठी गर्दी केली होती. येत्या बुधवारी गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे.

 

मार्केट यार्डातून दुपारी 2 वाजता मूर्ती दसरा चौक येथे आणली. सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. मिरवणुकीत मोरयाचा अखंड गजर, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, साऊंड सिस्टीमचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाईचा समावेश होता. तसेच पारंपरिक वेशभूषेत अबालवृद्ध, भगव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. वारकरी विद्यापीठ खुपीरेच्या बाल वारकर्‍यांनी राम कृष्ण हरीच्या ठेक्यावर ताल धरला होता. मिरवणुकीत मध्यभागी उंदीर, हत्तीची प्रतिकृती होती. तसेच रथामध्ये चांदीची गणेश मूर्ती होती. मिरवणुकीत दोन्ही बाजूला फॅन्सी झुंबर लाईटच्या छत्र्या होत्या. मिरवणूक दसरा चौकातून आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक मार्गे छत्रपती शिवाजी चौकातील मंडपात आली. येथे गणेशमूर्ती ठेवली.

 

यावेळी उद्योगपती सत्वशील माने, अभयसिंह देसाई, बाजार समितीचे संचालक नंदकुमार वळंजू, नेपालियन सोनुले, प्रसाद वळंजू, सुहास भेंडे यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

फलकांनी वेधले लक्ष

 

स्त्री भ्रूणहत्या रोखा, आमची भारतीय संस्कृती आम्ही जपणार, कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीला परत द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर झाल्याबद्दल अभिनंदन, असे लक्षवेधी फलक महिला हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -