ग्रेटर नॉएडामध्ये झालेल्या निक्की हिच्या निर्घृण हत्याकांडात, आता पोलिसांनी आरोपी पती विपिनच्या कुटुंबावर पकड घट्ट केली आहे. हुंड्यासाठी झालेल्या या भयानक हत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पुण्यात अवघ्याकाही महिन्यांपूर्वी वैष्णवी हगवणे हिचाही हुंड्यापायी जीव गेला, तशाच घटनेची आता ग्रेटर नॉएडामध्येही पुनरावृत्ती झाली असून यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणातील आरोपी पती विपिन भाटीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची आई दयावतीलाही बेड्या ठोकल्या. मात्र पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न विपिनने केला असता, झालेल्या चकमकीत पोलिसांनी त्याला गोळी मारली, जी त्याच्या पायाला लागली आहे. कोर्टाच्या आदेशनानंतर आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
निकीच्या कुटुंबानी असा आरोप लावला की, तिचा पती विपिनने तिला जाणूनबुजून जिवंत जाळले. निक्की आणि विपिनचे 2016 साली लग्न झाले होते, त्यानंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी तिचा सतत छळ केला जात होता. सासरच्यांनी प्रथम स्कॉर्पिओ कार आणि नंतर बुलेटची मागणी केली, जी निकीच्या कुटुंबानेही पूर्ण केली. मात्र त्यानंतर आरोपीच्या कुटुंबाचा लोभ आणखी वाढल्याचा आरोप आहे. त्यांनी निकीच्या कुटुंबाकडून थोडेथोडके नव्हे 36 लाख रुपयांची मागणी केली. मात्र हे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर निक्कीचा पती तिचा छळ करू लागला आणि त्याने तिचा जीव घेण्याचा भयानक कट रचला.
याप्रकरणी सोशल मीडियावर एक व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये आरोपी पती विपिन भाटी आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला निक्कीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. यानंतर, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये निक्की जळालेली होती आणि ती पायऱ्यांवरून खाली पडताना दिसली. आरोपी पती विपिनसोबत दिसलेली आणि निक्कीला मारहाण करणारी स्त्री म्हणजे तिची सासू, विपिनची आई दयावती आहे. जखमी निक्कीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथेच तिने अखेरचा श्वास घेतला.
एन्काऊंटमध्ये गोळी लागून विपिन जखमी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आणि निक्कीच्या बहिणी आणि मुलाने केलेल्या आरोपांनंतर, ग्रेटर नोएडा पोलिसांनी शनिवारी आरोपी पती विपिन भाटीला अटक केली. त्यानंतर रविवारी पोलिसांचं पथक, आरोपी विपिनला वैद्यकीय तपासणीसाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी घेऊन जात होते, मात्र तेव्हाच त्याने एका इन्स्पेक्टरचे शस्त्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला आणि त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबद्दल माहिती देताना एडीसीपी सुधीर कुमार यांनी सांगितलं की, विपिन भाटी यांना घटनास्थळी नेण्यात आले, जिथून पोलिसांना ज्वलनशील पदार्थाने भरलेली बाटली सापडली. मात्र याचदरम्यान, आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने एका इन्स्पेक्टरची पिस्तूल हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्याने पोलिस पथकावरही गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि आरोपीच्या पायाला गोळी लागली.
सासूलाही ठोकल्या बेड्या
या चकमकीत आरोपी विपिन भाटीला अटक केल्यानंतर, एका खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याची आई, निक्कीला त्रास देणारी तिची सासू, दयावती हिलाही जेआयएमएस रुग्णालयाजवळून अटक केली. निक्कीच्या छळात आणि तिच्या हत्येच्या कटात सासूची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे तपासात उघड झाले आहे. तिनेच विपिनला ज्वलनशील पदार्थ आणून दिले होते. एवढंच नव्हे तर निक्कीची हत्या करण्यासाठी तिनेच त्याला उकसवलं आणि त्याची मदतही केली. निक्कीच्या मृत्यूपासूनच सासू दयावती फरार होती, अखेर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.
बहीण आणि मुलाने नोंदवला जबाब
निकीची बहीण कांचन हिच्या सांगण्यानुसार, तिचे आणि तिच्या बहिणीचे (निक्कीचे) लग्न एकाच कुटुंबात झालं होतं. कांचनने सांगितले की, तिच्या पतीने आणि सासरच्यांनी निकीच्या मानेवर आणि डोक्यावर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर तिच्यावर ॲसिडही टाकलं. आणि तिच्या मुलासमोरच निक्कीला आग लावली. हे सगळं घडत असताना कांचनने निक्कीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं कोणीच ऐकलं नाही, उलट तिलाही मारहाण करण्यात आलीय. याप्रकरणात मुलाने दिलेला जबाबही खूप धक्कादायक आहे.