येथील प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. पण प्रसंगावधान राखत परिसरातील वाहचालक व नागरिकांच्या प्रयत्नामुळे आग विझविण्यात यश मिळविले. यामध्ये कारचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, येथील छ. शिवाजी पुतळा ते हुलगेश्वरी रोडवर सायंकाळच्या सुमारास चारचाकी गाडी जात होती. सदरची गाडी प्रांत कार्यालयासमोर आली असता कारने अचानक पेट घेतला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच वाहनचालकाला सांगितले. तसेच वाहनातील सर्वांना तात्काळ बाहेर काढत आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अधिशमन दलाचा बंब तसेच वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी आले. सर्वांनी आग विझविण्यास मदत केली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.