भारताचा दिग्गज क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यानं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. राहुलच्या राजीनाम्यासंदर्भातील माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे.
खरं तर प्रमुख खेळाडू संजू सॅमसन हा या हंगामात राजस्थान संघाकडून खेळणार नाही, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. ही चर्चा सुरू असतानाच, राहुल द्रविडनं राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनानं ही अधिकृत माहिती दिली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल २०२६ च्या पर्वाला सुरुवात होण्याआधीच आपला कार्यकाळ संपुष्टात आणणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल प्रवासात राहुल अनेक वर्षांपासून केंद्रस्थानी राहिला. त्याच्या नेतृत्वाचा खेळाडूंच्या एका पिढीवर विशेष प्रभाव राहिला आहे. संघात मूल्ये रुजवली आहेत आणि फ्रेंचाइजीच्या संस्कृतीवर एक अमिट छाप सोडली आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.
संघ व्यवस्थापन संरचनेच्या आढाव्याचा एक भाग म्हणून राहुलवर मोठी जबाबदारी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यानं ती स्वीकारली नाही. द्रविडनं दिलेल्या योगदानाबद्दल राजस्थान रॉयल्स, खेळाडू आणि जगभरातील त्याच्या लाखो प्रशिक्षकांकडून आभार, असेही निवेदनात म्हटले आहे.