त्या दोन वर्षांच्या मुलाला कधीच वाटलं नसेल की त्याला जन्म देणारी आई एके दिवशी लाडक्या मुलाला इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून फेकून मारेल. ही घटना गुजरातमधील सुरत येथील आहे.
आपल्या मुलाला इमारतीवरून खाली फेकल्याचा आरोप असलेल्या महिलेनेही उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली. गुरुवारी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. पोलिसांनी सध्या मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पूजा असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुरतच्या अल्थान परिसरात जन्मदात्या आईनेच आपल्या दोन वर्षांच्या मुलाला १३ व्या मजल्यावरुन खाली फेकले. त्यानंतर तिने स्वत:ही उडी मारुन आयुष्य संपवले. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी असलेल्या गणपती मंडळाच्या मंडपापासून अवघ्या २० फूट अंतरावर मुलाचा मृतदेह पडला होती. बराच वेळ या घटनेची कोणालाही माहिती मिळाली नाही. सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आई आणि मुलाला जमिनीवर पडलेले पाहिले तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या फुटेजमध्ये असे दिसून येते की, महिला प्रथम तिच्या मुलाला लिफ्टमध्ये वरच्या मजल्यावर घेऊन जाते. आणि नंतर तिथून तिच्या मुलाला खाली फेकून देते. मुलाचे खाली पडण्याचे फुटेज समोर आले आहे. मुलगा खाली पडल्यानंतर काही सेकंदातच महिलेनेही उडी मारून आत्महत्या केली. आई आणि मुलाचे मृतदेह एकमेकांपासून काही मीटर अंतरावर पडले होते. नंतर स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात, महिलेने प्रथम तिच्या मुलाला इमारतीवरून का फेकले आणि नंतर स्वतः उडी मारून आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिलेच्या कुटुंबाकडूनही आत्महत्येचे कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. अशा परिस्थितीत, मृत्यूचे कारण काय आहे याचा सध्या तपास सुरू आहे. पोलिसांनी मृत पूजाचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे आणि त्याचा तपास सुरू केला आहे.