केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवर्ता आली आहे. कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) 3 टक्क्यांनी वाढण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच याविषीची घोषणा करू शकते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याविषयीचा निर्णय जाहीर होऊ शकतो. दरवर्षी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याविषयीचा निर्णय घेण्यात येतो.
सध्या महागाई भत्ता ( DA) 55% इतका आहे. तो आता वाढून 58 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलै 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या काळात तीन महिन्यांची थकीत रक्कम (arrears) ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वर्षातून दोनदा वाढतो महागाई भत्ता
सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते. पहिल्यांदा जानेवारी-जूनसाठी होळीपूर्वी महागाई भत्ता जाहीर होतो. तर दुसऱ्यांदा जुलै-डिसेंबरासाठी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा होते. यंदा 20-21 ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे. त्यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्त्याचा निर्णय होऊ शकतो.
कसा निश्चित होतो महागाई भत्ता
महागाई भत्त्याची गणना ही CPI-IW (औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांक) आधारे करण्यात येते. जुलै 2024 पासून ते जून 2025 पर्यंत सरासरी CPI-IW 143.6 इतका राहिला. त्या आधारे नवीन महागाई भत्ता हा 58 टक्के असण्याची शक्यता आहे. ही 7 व्या वेतन आयोगाची अखेरची महागाई वाढ असेल. कारण या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे.
8 व्या वेतन आयोगाकडे लक्ष
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 8 व्या वेतन आयोगाकडे लक्ष लागले आहे. जानेवारी 2025 पासून नवीन वेतन आयोग लागू होईल. पण अजून या आयोगाच्या Terms of Reference (ToR) निश्चित झालेल्या नाहीत. आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांची नियक्ती करण्यात आलेली नाही. आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे नवीन वेतन निश्चिती 2027 च्या अखेरीस अथवा 2028 च्या सुरुवातीला होऊ शकते. त्यामुळे त्यासाठी कर्मचाऱ्यांना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.