राज्यात एकीकडे गणपतमी विसर्जनाच्या पवित्र सोहळा सुरु असून दुसरीकडे याला दुर्दैवी किनार लागली आहे. गणपती विसर्जनसाठी पुणे, नांदेड आणि मुंबईत विसर्जनासाठी गेलेल्या अनेकांचा पाण्यात बुडून आणि विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. यात पुणे जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला. तर नांदेडमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांपैकी दोन जण वाहून गेले. तर दुसरीकडे मुंबईच्या साकीनाका परिसरात मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात दुर्दैवी किनार लागली आहे. विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांचा वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वाकी खुर्द येथील भामा नदीत दोन तरुण बुडाले आहेत. यात २० वर्षांचा कोयाळी येथील विद्यार्थी आणि १९ वर्षांचा उत्तर प्रदेशातील तरुणाचा समावेश आहे. यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. याव्यतिरिक्त, बिरदवडी येथील एका विहिरीत आणि शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत प्रत्येकी एक व्यक्ती बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. भीमा नदीत बुडालेल्या व्यक्तीचे वय ४५ वर्षे होते. या हृदयद्रावक घटनांमुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
नांदेडमध्ये दोघे बेपत्ता
नांदेड जिल्ह्यातही गणेश विसर्जनादरम्यान अशीच दुर्दैवी घटना घडली. गाडेगाव शिवारातील आसना नदीत गणपती विसर्जनासाठी उतरलेले तिघे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले. मात्र बालाजी उबाळे आणि योगेश उबाळे हे दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ पथकाकडून मोहीम सुरू आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली.
मुंबईत एकाचा मृत्यू
तसेच मुंबईच्या साकीनाका परिसरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खैराणी रोडवरील श्री गजानन मित्र मंडळाची मिरवणूक सुरू असताना, मिरवणुकीच्या ट्रॉलीला लटकलेल्या ११ हजार व्होल्टेजच्या हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाला. यात बिनू शिवकुमार (वय ३६) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तुषार गुप्ता (१८), धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०) आणि करण कानोजिया (१४) असे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून, टाटा पॉवर कंपनीची वायर मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.