कुरुंदवाड शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एक गूढ घटना उघडकीस आली आहे.शिरढोण रस्त्यालगत नदीकाठाशी पौर्णिमेच्या व ग्रहणाच्या दुहेरी योगात एक भानामतीचा उतारा सापडला.
यात १९ बाहुल्या, दाबन दाबलेल्या काळ्या दोऱ्यात बांधलेली एक बाहुली, नारळ, हळद-कुंकू, गुलाल, तसेच हिरवा व लाल रंगाचा ब्लाउज पीस, अशी संशयास्पद सामग्री आढळून आली आहे.
कुरुंदवाड पालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या २० आहे. याच पार्श्वभूमीवर १९ बाहुल्या आढळली. यामुळे याला राजकीय छटा मिळाल्याने ‘एका नगरसेवकाला सोडून उरलेले सर्व जण बांधलेत का?’ अशा चर्चांना उधाण आले आहे. या दृश्याने परिसरात भीतीसोबतच प्रचंड खळबळ माजली आहे.
पौर्णिमा आणि ग्रहणाच्या संयोगात केलेली भानामती अधिक प्रभावी ठरते, अशी लोकधारणा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच हा उतारा मिळाल्याने शहरात दडपण, गूढता आणि कुतूहल यांचा माहोल निर्माण झाला आहे. एका संभाव्य नगरसेवकाने प्रतिस्पर्ध्यांना राजकीयदृष्ट्या “बांधणी” करण्याचा हा इशारा तर नाही ना, अशी चर्चा गल्लीबोळात रंगली आहे. या अफवेमुळे निवडणुकीच्या तोंडावर ही घटना राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. भानामतीचा प्रभाव की फक्त राजकीय डावपेच? असा तर्क- वितर्क लावला जात आहे.