आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडिया प्रमुख दावेदार मानली जात आहे. कारण भारतीय संघात दिग्गज खेळाडू आहे. त्यामुळे भारतीय संघाची बाजू भक्कम आहे. असं असताना भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना यजमान युएईसोबत होत आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने आयसीसी अकादमीत चांगलाच घाम गाळला आहे. या सराव शिबिरात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने भाग घेतला नव्हता. पण युएई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार यात काही शंका नाही. पण माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने कमकुवत संघाविरुद्ध खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी युएईविरुद्धच्या अंतिम इलेव्हनमध्ये बुमराहचा समावेश करण्याचा निर्णय घेतला तर आंदोलन करेन. जर तसं होत असेल तर मी तिथे जात आहे, असंही अजय जडेजा मजेशीर अंदाजात म्हणाला.
माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाने सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘जसप्रीत बुमराहा युएईविरुद्धच्या खेळवण्याची काय गरज आहे, यार? सहसा तुम्ही त्याला कापसाच्या लोकरीत गुंडाळून ठेवता. आता तुम्हाला यूएईविरुद्धही बुमराह हवा आहे का? एकतर त्याला अजिबात सांभाळू नका किंवा जर तुम्हाला त्याला सांभाळायचं असेलच तर अशा सामन्यात सांभाळा. तर्कशास्त्र असे म्हणते, पण आम्ही कधीही तर्कशास्त्राने काम करत नाही’
अजय जडेजा पुढे म्हणाला की, सामना युएईविरुद्ध आहे. मी त्यांचा कर्णधार मोहम्मद वसीम आणि त्याची प्रतिभा पाहिली आहे. तुम्ही कोणत्याही संघाला रँकिंग देऊ शकत नाही. पण ही टीम इंडिया आहे त्यांनी टी20 विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे, मी स्पष्ट आहे. जर बुमराह पहिला सामना खेळला तर मी आंदोलन करेन. दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने असा युक्तिवाद केला की एकदा एखाद्या खेळाडूची संघात निवड झाली की, वर्कलोड मॅनेजमेंटचा निवडीवर परिणाम होऊ नये. दरम्यान 2016 टी20 आशिया कप स्पर्धेत भारत आणि युएई यांच्यात एकमेव सामना झाला होता. या सामन्यात बुमराह खेळला होता. त्याने 4 षटकात एक विकेट घेत 23 धावा दिल्या होत्या.