पत्नी घरात मृतावस्थेत, तर घराच्या पाठीमागे झाडाला गळफास घेऊन पतीने आत्महत्या केल्याची घटना कोलेगाव (ता. धाराशिव) येथे मंगळवारी (ता. नऊ) सकाळी उघडकीस आली.
ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. नेमक्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोलेगावात कृष्णा तुकाराम टेकाळे (वय २७) हा आई-वडील, लहान भाऊ, पत्नी साक्षी, दीड वर्षाच्या मुलासह राहत होता. तो धाराशिव येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. आज सकाळी कृष्णाच्या खोलीमधून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने कृष्णाच्या आईने खोलीत जाऊन पाहिले. त्यावेळी कृष्णाची पत्नी साक्षी (२२) ही मृतावस्थेत आढळली. खोलीत कृष्णा न दिसल्याने त्याच्या आईने घराबाहेर पळ काढत शोध सुरू केला.
यावेळी घराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाला कृष्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार, ढोकीचे सहायक निरीक्षक विलास हजारे आदींनी घटनास्थळी भेट दिली.
कृष्णाच्या खिशामध्ये चिठ्ठी आढळली. ‘आम्ही आमच्या वैयक्तिक कारणांसाठी आत्महत्या करत असून याला कोणालाही जबाबदार धरू नये’, असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ढोकी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून उपनिरीक्षक किशोर माळी तपास करीत आहेत.
दीड वर्षाचं लेकरू पोरकं
छोट्याशा कोलेगावात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या दांपत्याच्या दीड वर्षाच्या बाळाच्या रडण्यामुळे या दोन्ही घटना निदर्शनास आल्या. मात्र, या निष्पाप चिमुकल्याला हे सारे समजण्यापलीकडचे होते. त्याची केविलवाणी अवस्था पाहून घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ गहिवरले होते.
साक्षी टेकाळेचा मृतदेह घरात आढळला, तर तिचा पती कृष्णा घराच्या पाठीमागे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. साक्षीने आत्महत्या केली की तिचा खून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्तरीय तपासणीचा अहवाल व सखोल तपासाअंती खून की आत्महत्या हे स्पष्ट होईल.