Tuesday, September 16, 2025
Homeकोल्हापूरकळंबा गॅस पाइपलाइन उद्ध्वस्त कुटुंबीय वार्‍यावर!

कळंबा गॅस पाइपलाइन उद्ध्वस्त कुटुंबीय वार्‍यावर!

कळंबा येथील मनोरमा कॉलनीत गणेशोत्सवाच्या तोंडावर 25 ऑगस्टला गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन भोजणे कुटुंबातील तीन निष्पाप जिवांचा बळी गेला. दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या चौघांवर सोळाव्या दिवशी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले…

 

पुढे तपास प्रक्रिया चालू राहील, संशयितांना अटक होईल, दोषारोपपत्रानंतर न्यायालयात खटला चालेल; पण कंपनी कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे एका सामान्य, गरीब कुटुंबाची वाताहत झाली त्याचे काय..? शीतल भोजणे यांच्यापाठोपाठ त्यांचे वयोवृद्ध सासरे आणि सहा वर्षांच्या चिमुरड्याला जीव गमवावा लागला. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना…

 

भोजणे कुटुंब मूळचे कोकणचे…पोटासाठी भटकंती करीत अमर भोजणे कुटुंबीयांसह कळंबा येथील मनोरमा कॉलनीत स्थिरावले. कष्टातून छोटेखानी पण टूमदार निवारा त्यांनी उभारला. पत्नी शीतल, मुलगा प्रज्वल (6) मुलगी ईशिका (3) आणि वयोवृद्ध वडील अनंत भोजणे (60) यांच्यासमवेत कुटुंब सुखाने नांदत होते. अमर भोजणे एका हॉटेलमध्ये कुक म्हणून कामावर कार्यरत असले, तरी ‘आहे त्यात समाधानी’ असा कुटुंबाचा स्वभाव. शेजार्‍यांशी सौदार्हाचे संबंध. त्यामुळे प्रज्वल आणि ईशिका या भांवडांविषयी कमालीची सहानुभूती भोजणे कुटुंबीयांचे मनोरमा कॉलनीतील पाच-सहा वर्षांचे वास्तव्य… तरीही कुटुंबीयांनी सुस्वभावातून गोतावळा निर्माण केला होता. 25 ऑगस्टला कॉलनीत घरोघरी गणेश आगमनाची तयारी सुरू होती. प्रज्वल आणि ईशिका वृद्ध आजोबांसमवेत घरात हॉलमध्ये गणेशोत्सवासाठी मूळगावी देवरूख(ता. संगमेश्वर) जाण्याची तयारी करीत होते, तर शीतल जेवणखान करून स्वयंपाक खोलीत आवरा- आवर करीत होत्या. रात्री साडेदहाला स्वयंपाक खोलीतील दिवे बंद करीत असतानाच घरात जिवघेणा स्फोट झाला. क्षणार्धात स्फोटाने शीतलला वेढले. आगीच्या ज्वालासह त्या घरातून बाहेर आल्या. स्फोटामुळे दोन चिमुरड्यांसह वृद्धही भाजून जखमी झाले.

 

कळंबा पंचक्रोशीत सन्नाटा

 

क्षणार्धात नेमके काय घडले… सुचत नव्हते. शीतल गडागडा लोळत होत्या, तर चिमुरडे जिवाच्या आकांताने आक्रोश करून घेत होते. कॉलनीतील नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात हलविले. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तीन निष्पाप जिवांचा बळी गेला. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे मनोरमा कॉलनीच नव्हे, तर कळंबा पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

 

मानवी चुकांमुळे चिमुरड्यांसह निष्पापांचे बळी!

 

भीषण दुर्घटनेप्रकरणी फॉरेन्सिक तज्ज्ञांनी गॅस पाईपलाईन जोडणी करणार्‍या कंपनी अभियंत्यासह चौघांवर ठपका ठेवला आहे. सरकारच्या वतीने गौरव गुणानंद भट, हरिष दादासाहेब नाईक, महंमदहुजेर हबीबुररहमान हुजेरअली, अमोल टी. जाधव यांच्याविरुद्ध सदोषमनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांवरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास प्रत्येकी दहा ते पंधरा वर्षांचा कारावास होऊ शकतो; पण केवळ मानवी चुकांमुळे तिघा निष्पापांचे बळी गेले आहेत. एव्हाना भीषण दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे सरसावणार का, हा प्रश्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -