सावंतवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. गुरुवारी (दि. 11) घडलेल्या या घटनेत पत्नी 70 टक्के भाजली होती. रविवार, दि.14 रोजी तिचा सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिता संजय बेंगडे (वय 40, रा. सावंतवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय बयाजी बेंगडे (53) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. कोकरूड पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनिता व त्यांचा पती संजय बेंगडे सावंतवाडी येथे राहत होते. मुलगा कामानिमित्त मुंबईस असल्याने घरी दोघेच असत. संजय याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तो वारंवार अनिता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत होता. गुरुवारी रात्री अनिता या घरात स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी संजय याने त्यांच्याशी वाद घातला. चारित्र्याच्या संशयावरून मारहाण, शिवीगाळ केली. चूल पेटवण्यासाठी आणलेले डिझेल अनिता यांच्या अंगावर ओतले आणि काडीपेटीने त्यांना पेटवून दिले. जिवाच्या आकांताने ओरडत अनिता घराबाहेर पळाल्या. शेजार्यांनी पाणी, कापड टाकून आग आटोक्यात आणली. आगीत अनिता 70 टक्के भाजल्या. त्यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील, सहायक निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. रविवारी अनिता यांच्या मृत्यूनंतर पती संजय बेंगडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास अटक करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 15) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मृत्युपूर्वी दिला जबाब…
आगीमध्ये 70 टक्के भाजल्याने अनिता यांची प्रकृती गंभीर होती. तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी रुग्णालयात अनिता यांचा जबाब नोंदवला. अनिता यांच्या जबाबावरून पोलिसांनी संजय बेंगडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.