Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रडॉक्टरने डॉक्टरचाच केला मोठा विश्वासघात; घातला 70 लाखांचा गंडा, पोलिसांकडून आरोपींचा शोध

डॉक्टरने डॉक्टरचाच केला मोठा विश्वासघात; घातला 70 लाखांचा गंडा, पोलिसांकडून आरोपींचा शोध

कल्याणमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याने फार्मासिस्टसह दुसऱ्या डॉक्टरला तब्बल 70 लाखांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पन्नास खाटांच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर देण्याचं आमिष या दाम्पत्याने दाखवलं होतं. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी दाम्पत्य फरार आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

 

कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये 50 खाटांचं हॉस्पिटल सुरू करण्याचं आमिष दाखवून डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हे दोघं ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे आहेत. डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2024 मध्ये आरोपी दाम्पत्याने “हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी” असं सांगून मेडिकल स्टोअर सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. या बहाण्याने त्यांनी 80 लाख रुपये मागितले होते. मात्र दोघांनी मिळून 70 लाख रुपयांची रक्कम चेकद्वारे दिली.

 

साळी दाम्पत्याने तीन महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र एक वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू झालं नाही आणि पैसेही परत केले नाहीत. याबाबत प्रज्ञा कांबळे आणि डॉ. दुबे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात लेखी करार आणि कागदोपत्री पुरावे दाखल करत तक्रार नोंदवली. या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोघंही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान, फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

 

“डॉक्टर दाम्पत्याने आयकॉन बिल्डिंगमध्ये हॉस्पिटल सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची मालकी त्यांच्याकडे होती. त्यांनी आमच्याकडे ऐशी लाख रुपयांची मागणी केली होती. आम्ही त्यापैकी सत्तर लाख रुपये त्यांना दिले होते. आता चौदा महिने उलटले तरी आम्हाला आमचे पैसे परत मिळाले नाहीत आणि त्यांनी हॉस्पिटलदेखील सुरू केलं नाही,” अशी तक्रार डॉ. राहुल दुबे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -