सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक केली आहे. त्यानुसार ज्या शिक्षकांचे वय ५२ वर्षांपेक्षा कमी आहे, त्या सर्वांनाच आता ‘टीईटी’ परीक्षा द्यावी लागणार आहे.
या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘टीईटी’साठी राज्यभरातील हजारो शिक्षक आतापासूनच अभ्यासाला लागले आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार फेब्रुवारी २०१३ पासून शिक्षक होण्यासाठी टीईटी बंधनकारक केली. त्यानंतर झालेल्या शिक्षक भरती त्यानुसारच झाल्या आहेत; पण त्यापूर्वीच्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’चे बंधन नव्हते. आता सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना सर्वच शिक्षकांसाठी ही परीक्षा बंधनकारक असल्याचा निकाल दिला. त्यानंतर काही राज्यांनी त्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शविली.
उत्तर प्रदेशसह काही राज्यांनी अशा याचिका दाखल देखील केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील ९५ हजार शाळांमधील दीड ते पावणेदोन लाख शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ‘टीईटी’ द्यावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाचीच संधी देण्यात आली आहे. मुदतीत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचाही इशारा न्यायालयाने निकालातून दिला आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरला होणारी ‘टीईटी’ देण्याचा निर्णय अनेक शिक्षकांनी घेतल्याचे राज्यभरातील चित्र आहे.
१५ पासून अर्जांची प्रक्रिया
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी या वर्गांवर शिक्षणसेवक, शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. १० ते २३ नोव्हेंबरदरम्यान प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. पेपर एक २३ नोव्हेंबरला सकाळी १०.३० ते दुपारी एक, या वेळेत, तर पेपर दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५, या वेळेत होणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. याबाबत https://mahatet.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल.