पश्चिम बंगालमधील मालदा येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीच्या रहस्यमय मृत्यूने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर आणि ज्युनियर डॉक्टर उज्ज्वल सोरेन याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे.
मृत तरुणी वयाच्या २४ व्या वर्षी एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.
आरोपी प्रियकर अटकेत
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वल सोरेन याला त्याच्या मोबाईल लोकेशनच्या (Mobile location) आधारे पुरुलिया जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्याला मालदा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.
एक वर्षांपासून होते प्रेमसंबंध
उज्ज्वल सोरेन हा मालदा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्युनियर डॉक्टर आहे. पीडिता मात्र कोलकात्याच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. गेल्या एक वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. या नात्यात पीडिता एकदा गर्भवतीही राहिली होती, मात्र तिचा गर्भपात झाला. पीडितेच्या आईच्या मते, तिच्या मुलीने आणि उज्ज्वलने मंदिरात लग्न केले होते. मात्र, कोर्ट मॅरेज करण्याचा विषय निघताच उज्ज्वल तिच्यापासून दुरावू लागला.
गूढ मृत्यू आणि संशय
प्राथमिक तपासणीत एमबीबीएस विद्यार्थिनीचा मृत्यू हा कदाचित ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिस वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
‘माझ्या मुलीच्या तोंडातून फेस येत होता’
पीडितेच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले, “सोरेनने माझ्या मुलीला मालदा येथे बोलावले होते. ती गेल्या सोमवारी त्याच्याकडे राहायला गेली. कदाचित, त्यांच्यात वाद झाला असेल आणि तिने काहीतरी प्राणघातक पदार्थ घेतला असेल, किंवा तिला जबरदस्तीने काही दिले असावे. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले, तेव्हा माझ्या मुलीच्या तोंडातून फेस येत होता आणि त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. माझ्या मुलीचा मृत्यू अपघाती नसून तिच्या प्रियकराने तिला मारले आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी.”