आठ दिवसांच्या तेजीला ब्रेक लागल्यानंतर आज मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने हलक्या वाढीसह सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेंसेक्स 70 अंकांनी वर गेला, तर निफ्टी 40 अंकानी वाढला
मात्र बँक निफ्टीमध्ये घसरण दिसून आली.
जागतिक बाजारांतून सकारात्मक संकेत मिळत असले तरी गुंतवणूकदार आज वीकली एक्सपायरीमुळे थोडे सावध दिसत आहेत. अमेरिकन बाजारांनी चीनसोबत होऊ घातलेल्या ट्रेड डीलच्या पूर्वी आणि फेडच्या बैठकीपूर्वी नवीन उच्चांक गाठला आहे.
नॅस्डॅकने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली, तर S&P 500 आणि डाओ जोन्सदेखील वाढीसह बंद झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी शुक्रवारी फोनवर संवाद साधणार असल्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्सा वाढला आहे.
दरम्यान, अमेरिकन ट्रेड टीम भारतात दाखल झाली असून दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापारावर चर्चा होणार आहे. मात्र टॅरिफ आणि मोठ्या व्यापार करारावर बोलणी होणार नसल्यामुळे बाजारावर याचा तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही.
कमॉडिटी बाजारातही जोरदार हालचाल सुरू आहे. सोन्याने देशांतर्गत बाजारात ₹1,10,330 प्रति तोळ्याचा तर चांदीने ₹1,29,622 प्रति किलोचा नवा उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $3,720 प्रति औंसच्या वर गेलं आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) गेल्या सत्रात तब्बल ₹2,700 कोटींची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग 15व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत ₹1,933 कोटींची खरेदी केली. IPO बाजारात आजपासून Euro Pratik Sales या कंपनीचा IPO खुला झाला आहे. प्राइस बँड ₹235 ते ₹247 दरम्यान आहे.
करदात्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे सरकारने आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवली आहे. त्यामुळे आजही ITR भरता येणार आहे.