भांडणं, वाद-विवाद आणि ड्रामाशिवाय ‘बिग बॉस’चा कोणताच सिझन पूर्ण होणार नाही. ‘बिग बॉस 19’ला सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये 16 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाजने वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली. त्यानंतर बिग बॉसच्या घरात एकूण 17 स्पर्धक झाले. अशातच गेल्या आठवड्यात थेट डबल नॉमिनेशन पहायला मिळालं. त्यातून नगमा आणि नतालिया हे दोन स्पर्धक घराबाहेर गेले. आता 15 स्पर्धकांमध्ये खेळ रंगला आहे. नवीन आठवड्याच्या सुरुवातीलाच ‘बिग बॉस 19’च्या घरात नवीन नॉमिनेशन पहायला मिळालं. यामध्ये थेट एक किंवा दोन नव्हे तर पाच स्पर्धक नॉमिनेट झाले.
‘बिग बॉस’ने तिसऱ्याच आठवड्यात घरातील संपूर्ण खेळ उलटून लावला. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिषेक बजाज आणि शहबाज यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं दिसलं. त्यानंतर अशी चर्चा होती की या दोघांना संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. परंतु प्रत्यक्षात असं काही घडलंच नाही. आता जी नॉमिनेशनची यादी समोर आली आहे, त्यात शहबाजचं नावच नाही. ‘बिग बॉस’ने घरातील सर्व सदस्यांना बोलावून त्यांना अशा दोन स्पर्धकांची नावं विचारली, ज्यांना या आठवड्यात बेघर होण्यापासून वाचवायचं आहे. यामध्ये अमाल मलिक कॅप्टन असल्याने सर्वांत आधी तो सुरक्षित झाला. नंतर त्याने नीलम आणि जीशान यांची नावं घेतली.
अशनूर कौरने गौरव खन्ना आणि तान्या मित्तल यांची नावं घेतली. अभिषेकने अशनूर आणि आवेज यांची नावं घेतली, तर बसीरने नीलम आणि जीशान यांचा वाचवलं. जीशानने तान्या-शहबाज, तान्याने नीलम-शहबाज, शहबाजने जीशान-कुनिका यांना सुरक्षित केलं. नीलमने तान्या-कुनिकाला, कुनिकाने नीलम-शहबाजला आणि नेहलने फरहाना-शहबाजला वाचवलं आहे.
सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर बिग बॉसने त्या पाच स्पर्धकांची नावं घेतली, जे या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. यातील पहिलं नाव नेहल, दुसरं अभिषेक बजाज, तिसरं अशनूर कौर, चौथं प्रणित मोरे आणि शेवटचं नाव बसीर अलीचं होतं. या पाच स्पर्धकांवर आता एलिमिनेशनची तलवार आहे. यापैकी कोणाला बिग बॉसचं घर सोडावं लागेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



