शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 17) अंबाबाई मंदिरातील गाभार्याची स्वच्छता केली जाणार आहे. त्यामुळे दिवसभर गाभार्याचा दरवाजा बंद करण्यात येणार असून अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे.
दरम्यान, महासरस्वती मंदिराजवळ अंबाबाईच्या उत्सवमूर्तीच्या दर्शनाची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीपूजक मंडळाच्या वतीने देण्यात आली.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता आय स्मार्ट फॅसिटेक कंपनीचे कर्मचारी गाभार्याच्या स्वच्छतेला सुरुवात करणार आहेत. वॉटर जेट मशिनच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी अंबाबाईच्या मूर्तीला इरल्याने आच्छादित करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत गाभार्याची स्वच्छता पूर्ण करण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.



