अशी कशी आई? सातवीतील पोरीचं लग्न लावूनबीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचे तिच्या आई आणि नातेवाईकांनी लग्न लावून दिलं आणि नंतर सदर मुलीच्या आईनेच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचं उघड झालं आहे.
सातवीत शिक्षण घेत असताना माझ्या मनाविरुद्ध आई आणि नातेवाईकांना विवाह लावून दिल्याची तक्रार पीडित मुलीने धारूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. लग्न झाल्यापासून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे.
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आईसोबत राहत होत्या. त्यांचे वडील 2016 मध्ये घर सोडून गेले होते. त्यानंतर 2017 मध्ये ही मुलगी सातवी इयत्तेत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूरमधील एका मंदिरात लग्न लावून दिले. या लग्नाला मुलीचा विरोध होता, लग्नाला आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा आणि चुलत सासू यांनी लग्न लावले, असे फिर्यादीत सांगण्यात आले आहे.
काही दिवसांनी त्या अल्पवयीन मुलीस तिच्या सासरी नांदायला पाठवले गेले. तिथे तिच्या पतीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता, त्यांनी तिलाच बळजबरी केली असल्याचा आरोपीही या फिर्यादीत करण्यात आला आहे. नंतर मुलीने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. मात्र ‘तू आम्हाला बदनाम करत आहेस’ असे बोलून पती आणि आई असे दोघे मिळून अल्पवयीन मुलीस त्रास देऊ लागले. शेवटी या त्रासाला कंटाळून ती मार्च 2022 मध्ये आजी-आजोबांकडे गेली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेथेही आई आणि पती पोहचले. त्यानंतर आपल्याला होत असलेल्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून त्या अल्पवयीन मुलीने 17 एप्रिल 2022 रोजी मानवलोक सेवाभावी संस्था, अंबाजोगाई येथे जात तेथील अधिकारी अरुंधती पाटील यांना सर्व हकीकत सांगितली. 18 एप्रिल 2022 रोजी मानवलोक सेवाभावी संस्थेतील अश्विनी जगताप यांनी तिला बाल कल्याण समिती, बीड येथे हजर केले. समितीच्या आदेशानुसार ती अंबाजोगाई येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या बालगृहात राहत आहे.
दरम्यान, ऑगस्ट 2025 मध्ये बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांनी भेट दिल्यावर हा घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणात चार वर्षांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य संतोष वारे, सुरेश राजहंस, छाया गडगे आदींनी पीडितेला धीर दिला असल्याचे सांगण्यात आले आहे.