भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने यंदा दक्षिणेचे सुपरस्टार मोहनलाल यांना गौरवण्यात येणार आहे. सिनेमासृष्टीसाठी मोठे योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. अलिकडे केंद्र सरकारने दादासाहेब फाळके 2023 साठी अभिनेता मोहनलाल यांची घोषणा केली होती. या बातमीमुळे मोहनलाल यांच्या चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीवर प्रेम करणाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दक्षिणेतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांची दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने शिफारस केली होती. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. मोहनलाल यांना हा प्रतिष्ठीत पुरस्कार येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे.
पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया एक्स हँडलवर पोस्ट करीत अभिनेते मोहनलाल यांना या पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलेय की मोहनलाल हे उत्कृष्ठता आणि बहमुखी प्रतिभेचे प्रतीक आहेत. त्यांच्या प्रदीर्घ आणि शानदार फिल्म करियरमध्ये त्यांनी मळ्यालम सिनेमा आणि थिएटरमध्ये चमकते तारे बनले.केरळ संस्कृतीबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे आणि आपल्या कामातून त्यांनी केरळ संस्कृतीला पुढे आणले. त्यांनी तेलगु, तमिळ, कन्नड आणि हिंदीतही प्रभावी अभिनयाची कमाल दाखविली आहे.
400 हून अधिक चित्रपटात काम केले
मोहनलाल यांच्या चित्रपट प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अभिनयासह दिग्दर्शन आणि प्रोडक्शन देखील केले आहे. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. मळ्यालमच नाही तर तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कार, ९ केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड्स मिळालेले आहेत. भारत सरकारने त्यांच्या कारकीर्दीच्या गौरव म्हणून त्यांचा पद्मभूषण आणि पद्मश्रीने गौरव केला आहे.