डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बेकायदेशीरपणे विनापरवाना नशेच्या इंजेक्शनच्या बाटल्यांची विक्री करणारा कदमवाडीतील मेडिकल दुकानदार व विकत घेणारा अशा दोघांना पोलिसांनी गुरुवारी (दि.
25) अटक केली. तेजस उदयकुमार महाजन (35, रा. प्लॉट नं. 109, शिवाजी पार्क) व विवेक शिवाजी पाटील (30, रा. माळीवाडी, उचगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून इंजेक्शनच्या 75 बाटल्या जप्त केल्या.
एस. टी. स्टँड परिसरातील फूलवाले ते निंबाळकर चौक या मार्गावर नशेच्या इंजेक्शनची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. एक व्यक्ती दुचाकीवरून येऊन थांबली. काही वेळातच तेथे आणखी एक व्यक्ती आली. दुचाकीवरील बाटल्यांचा बॉक्स त्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीच्या ताब्यात दिला. तो बॉक्स गाडीच्या डिक्कीत ठेवत असताना पोलिसांनी त्यांना पकडले.
दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी महाजन व पाटील अशी नावे सांगितली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता महाजन याचे कदमवाडीतील महादेव मंदिराजवळ महाजन मेडिकल नावाचे दुकान असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून नशेच्या इंजेक्शनच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल आदी सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.








