आशिया कप स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. 28 सप्टेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. भारताने याच स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. आता विजयाची हॅटट्रीकसह जेतेपदावर नाव कोरायचं आहे. तर पाकिस्तान दोन पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. खरं तर या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण भारतीय संघ ताकही फुंकून पित आहे. भारत आणि पाकिस्तानच्या कर्णधारांना अंतिम सामन्याबाबत काय वाटतं? असे प्रश्न विचारले गेले. खरं तर या सामन्याआधी पत्रकार परिषद वगैरे झाली नाही. पण सुपर चार फेरीतील शेवटचा सामना खेळल्यानंतर दोन्ही कर्णधारांना आपला हेतू स्पष्ट केला आहे.
सूर्यकुमार यादव म्हणाला की…
सुपर 4 फेरीत श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर सूर्यकुमार यादवने अंतिम सामन्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘अंतिम फेरीत दाखल झाल्याचा आनंद आहे. पण सध्या त्या बाबत काही विचार करत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूला संदेश होता की निर्भयपणे खेळा. त्यांना माहिती आहे की मला काय हवे आहे आणि त्यांना काय करण्याची आवश्यकता आहे. त्यांना माझ्या योजना कशा अमलात आणायच्या हे माहिती आहे.’ सूर्यकुमार यादवच्या विधानातून स्पष्ट आहे की अंतिम फेरीत काहीच चिंता नाही. काय करणार हे त्याने आधीच स्पष्ट केलं आहे. तसेच पाकिस्तानचं पूर्वीसारखं आव्हान नाही हे देखील स्पष्ट केलं आहे. कारण टी20 मधील विजय आणि पराभवाचं अंतर बरंच वाढलं आहे.
सलमान आघा म्हणाला की….
आशिया कप स्पर्धेत बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने मत व्यक्त केलं होते. सलमान आघा म्हणाला होता की, “आम्हाला आता काय करायचे आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही कोणत्याही संघाला हरवण्यास सक्षम आहोत. आणि आम्ही रविवारी तेच करण्याचा प्रयत्न करू.” आता कोणाचा शब्द खरा ठरतो हे अंतिम सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. भारत जिंकतो की पाकिस्तान बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
