हातकणंगले तालुक्यातील गंगानगर येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची 2024-25 ते 2028-29 सालासाठी झालेल्या संचालक पदाची बिनविरोध निवडणूक ग्राह्य ठरणार की फेर निवडणूक लागणार याचा निकाल 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
त्यामुळे या निकालाकडे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारखान्याच्या संचालक पदासाठी डिसेंबर 2024 मध्ये निवडणूक लागली होती. या निवडणुकीत पी. एम. पाटील पॅनेलचे 17 संचालकांचे अर्ज उरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यास मान्यता घेण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे ही नावे पाठवली होती. तथापि, काहींनी या विरोधात तक्रारी दाखल केल्याने प्राधिकरणाने ही निवडणूक रद्द करीत फेर निवडणूक लावली होती. दरम्यान, काही सभासदांनी उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल करून या फेर निवडणुकीस स्थगिती आणली. तसेच बिनविरोध झालेली निवडणूक बरोबर असल्याने त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे .
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात झाल्याने ही याचिका कोल्हापूरला वर्ग झाली. शुक्रवारी सर्किट बेंच कोल्हापूर येथे या याचिकेवर न्या. चपळगावकर यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायाधीशानी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले असून, याबाबत 10 ऑक्टोबर 2025 रोजी निकाल होणार आहे. कारखान्याची निवडणूक होऊन नऊ महिने झाल्याने सभासदांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
